शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 02:07 PM2019-09-27T14:07:24+5:302019-09-27T14:25:02+5:30

औरंगाबाद पश्चिममध्ये निवडणूक होणार नागरी प्रश्नांवरच

Maharashtra Assembly Election 2019 : BJP's Raju Shinde's challenge before shiv sena's Sanjay Shirsat ? | शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यासमोर भाजपाच्या राजू शिंदे यांचे आव्हान?

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसच्या उमेदवारीबाबत चित्र अस्पष्टच शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपाची तयारी

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना युतीबाबत घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवार अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांकडून लढण्याची तयारी सुरू आहे. 

प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात  भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी आपला दावा आधीच ठोकला आहे. युती न झाल्यास शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध लढण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघात त्यांनी मोठे कार्यालयही थाटले आहे. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 

मागील पाच वर्षांत महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भागाचे प्रश्न मांडल्याचे दिसत आहे. वाळूज महानगर आणि बजाजनगर परिसरातही त्यांच्या अनेक चकरा होऊन नागरिकांच्या भेटी झाल्या आहेत. मतदारसंघातील प्रचार कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.  शिवसेनेचे शहराचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय सुरू झाले आहे. मात्र, विद्यमान आमदार शिरसाट यांची त्या मानाने तयारी दिसत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांत त्यांचा जनसंपर्कही कमी झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. याच गोष्टी हेरून राजू शिंदे यांनी आपला जनसंपर्क वाढविला आहे. सातारा- देवळाईचे अनेक मुद्दे शिंदे यांनी निवडणुकीच्या दृष्टीनेच महापालिकेत उपस्थित केल्याचे आता समोर येत आहे. युती न झाल्यास शिंदे यांचे आ. शिरसाट यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. 

औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून राजू शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आता आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आ. शिरसाट यांच्याशिवाय शिवसेनेतून इतरही अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.

काँग्रेसमध्ये काय?
आघाडीमध्ये यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने लढविला आहे. २००९ मध्ये काँग्रेस उमेदवार चंद्रभान पारखे हे संजय शिरसाट यांच्या विरोधात दुसऱ्या स्थानी होते, तर २०१४ मध्ये जितेंद्र देहाडे हे काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे या मतदारसंघात वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यामुळे ही जागा अन्य पक्षाला देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. ४मात्र, याबाबत निश्चित अशी माहिती समोर येत नाही. देहाडे यांच्यासह जयप्रकाश नारनवरे, पंकजा माने यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसचे औरंगाबाद शहरातील कार्यकर्ते ही जागा इतर पक्षाला सोडण्यात येऊ नये, असा आग्रह करीत आहेत. तूर्तास या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत स्पष्ट चित्र नाही.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : BJP's Raju Shinde's challenge before shiv sena's Sanjay Shirsat ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.