Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारीच्या मोर्चेबांधणीसाठी औरंगाबादच्या सर्व मतदारसंघात समुदायनिहाय चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:37 PM2019-09-28T12:37:56+5:302019-09-28T12:39:52+5:30
उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी म्हणून विविध समुदायाच्या बैठका आणि चर्चा झडू लागल्या आहेत.
औरंगाबाद : विविध पक्षांची एकमेकांशी युती होते की नाही आणि कोणती जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची चर्चा राजकीय वर्तुळात असताना शहरातही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी म्हणून विविध समुदायाच्या बैठका आणि चर्चा झडू लागल्या आहेत.
शिवसेनेकडून शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघातून ब्राह्मण समुदायाच्या इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. आजवर पक्षाने नगरसेवक, मनपातील एखादे पद आणि संघटनेतील एखादी जबाबदारी ब्राह्मण व ओबीसी समाजाला दिली आहे. यापलीकडे दुसरे कोणतेही लाभाचे पद पक्षाकडून मिळत नसल्याची भावना अनेक जण बोलून दाखवू लागले आहेत. या घटकांना विधानसभेत उमेदवारी देण्याचा विचार आजवर झालेला नाही. तिन्ही मतदारसंघांत ब्राह्मण व ओबीसी समाजाचे मतदान निर्णायक आहे. त्यातल्या त्यात मायक्रो ओबीसींचे मतदान आजवर शिवसेना किंवा युतीकडे झुकलेले आहे. लोकसभा निवडणुकीत ब्राह्मण आणि ओबीसी मतांमुळे चंद्रकांत खैरे यांचे डिपॉझिट वाचले आहे.
युती तुटली तर पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. तिथे राजू वैद्य यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. युती होवो अथवा न होवो मध्य मतदारसंघातून सुहास दाशरथे किंवा बंडू ओक यांच्यापैकी एकाचा विचार करावा, यासाठी ब्राह्मण समाज संघटनांमध्ये चर्चा आहे. दाशरथे यांना तीन निवडणुकांपासून थोपविले जात आहे. तर ओक यांच्याबाबतही पक्षाने काहीही विचार आजवर केलेला नाही.