औरंगाबाद जिल्ह्यातील लढती ठरतील लक्षवेधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 04:54 PM2019-10-02T16:54:20+5:302019-10-02T16:55:31+5:30
मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही.
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : उमेदवारी अर्ज भरायला तीन दिवसांचा अवधी आहे. एकाही महत्त्वाच्या उमेदवाराने अद्याप आपला अर्ज भरला नाही. उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर, छाननी झाल्यानंतर व अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, पुरेसे चित्र स्पष्ट होईलच; परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील लढती लक्षवेधी ठरणार, गाजणार, जातीय समीकरणे मांडली जाणार, पैशांचा पुरेपूर वापर होणार, मूळ प्रश्न बाजूला ठेवून भावनिक प्रश्नांचे भांडवल केले जाणार यात कुठलीही शंका नाही.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघाकडे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. अब्दुल सत्तार यांच्या अस्तित्वाची लढाई तेथे बघायला मिळणार! कालपरवापर्यंत काँग्रेसचा तिरंगा झेंडा हातात घेतलेले सत्तार यांना शिवसेनेचा भगवा घेताना काहीही वाटले नाही. राजकारण किती सत्ताकेंद्रित असते, हेच सत्तार यांनी सिद्ध केले आहे. अर्थात, त्यांचा पराभव करण्यासाठी सत्तारविरोधक सारेच जण एकवटणार, ताकद लावणार, सिल्लोडची भाजपची मंडळी किती बंडखोरी करणार यावर ही निवडणूक रंगतदार होणार, याबद्दल शंका नाही.
हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभेची निवडणूक गाजवली. त्यांचा ट्रॅक्टर फॅक्टर अजूनही सर्वांच्याच लक्षात आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. शिवस्वराज्य बहुजन पार्टीचे ते उमेदवार असतील; पण त्यांच्या पाठीमागे अनेक अदृश्य शक्ती राहतील, हे सांगणे न लगे.
औरंगाबाद मध्यमध्ये अनेक उमेदवारांच्या उड्या पडत आहेत. एमआयएमसाठी मध्य खूपच प्रतिष्ठेचा राहणार आहे. याच मतदारसंघातून मागे आमदार बनलेले प्रदीप जैस्वाल हे आपले नशीब अजमावताहेत. भाजपकडून दगाफटका न झाला तरच जैस्वाल यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहील. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी या महत्त्वाच्या उमेदवारांशिवाय मध्यमधून छोट्या-मोठ्या पक्षांना उभे राहून न्यूजसेन्स व्हॅल्यू वाढवून घ्यायची आहे.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे राजेंद्र दर्डा यांनी प्रतिनिधित्व केलेले. आमदार निधी काय असतो, हे साऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले. मंत्रीपदाचा विकासासाठी किती प्रभावीपणे उपयोग करून घेता येतो, हे त्यांनी खेचून आणलेल्या डीएमआयसीवरून लक्षात आल्याशिवाय राहत नाही; परंतु यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी या मतदारसंघासाठी योग्य उमेदवाराच्या जणू शोधातच आहे. भाजप-सेनेतर्फे अतुल सावे हेच लढणार... पण शेवटपर्यंत बंडखोरीचे आव्हान त्यांनाही राहीलच. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुणाचा फायदा करून जातील, यावरही बरेचसे अवलंबून आहे.
औरंगाबाद पश्चिमचे विद्यमान उमेदवार संजय शिरसाट यांनी अनेक वादविवादानंतर एबी फॉर्म मिळविण्यात यश मिळवले. तेथे भाजपची बंडखोरी होते का, ते पाहावयाचे. पैठण, गंगापूर, वैजापूर येथील लढती रंगतदार होतील. गंगापूरमधून विद्यमान आ. प्रशांत बंब यांना विजयाचा मार्ग वाटतो तेवढा सुकर नाही. वैजापूर यावेळी शिवसेना खेचून घेणार का, हा प्रश्न आहे. पैठणची जागा राखण्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना यश मिळते का, हे सारेच पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिल्लोडप्रमाणेच फुलंब्रीकडेही सर्वांचे लक्ष
सिल्लोडप्रमाणेच फुलंब्री मतदारसंघही गाजणार आहे, यावेळीही भाजपचे उमेदवार म्हणून हरिभाऊ बागडे यांनी शड्डू ठोकलेला आहे. भाजपच्या घटनेत उमेदवारीसाठी कुठलीही अट नाही, असा खुलासा करीत विधानसभेचे विद्यमान सभापती असलेल्या नानांना आगामी काळातही मोठमोठी पदे भूषवायची आहेत, ही त्यांची मनीषा लपून राहिलेली नाही.कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे मागच्या वेळी फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. हे भान ठेवूनच ते मतदारसंघात सतत सक्रिय राहिलेले आहेत. त्यामुळे नानांना वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही.