Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ३०१ उमेदवारी अर्ज घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:22 PM2019-09-28T12:22:45+5:302019-09-28T12:28:39+5:30
पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात केली असून, अधिसूचना जारी झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३०१ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पितृपक्षामुळे शुक्रवारी जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. फक्त दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
२८, २९ सप्टेंबरला सुटी असणार आहे. २ आॅक्टोबरलादेखील सुटी आहे. त्यामुळे ४ आॅक्टोबरपर्यंत ४ दिवसच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. त्यात ३० सप्टेंबर, १, ३ व ४ आॅक्टोबर या दिवसांत उमेदवारी अर्ज भरता येणे शक्य आहे. पूर्व आणि कन्नडमध्ये प्रत्येक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघनिहाय नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज नेल्याच्या माहितीचा आढावा घेतला. त्यानुसार पूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी ३०१ उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पश्चिममध्ये सर्वाधिक ६५ अर्ज नेले
पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक ६५ उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्याखालोखाल पूर्व मतदारसंघातून ५२, तर मध्य व गंगापूर मतदारसंघातून अनुक्रमे ३६ व ३५ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. उमेदवारी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवसाचा आकडा पाहता नऊ मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता दिसत आहे. मध्य मतदारसंघातून कीर्ती शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज नेला. पहिल्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
मतदारसंघ उमेदवारी अर्ज संख्या
फुलंब्री १८
सिल्लोड १३
कन्नड २६
वैजापूर ३०
गंगापूर ३६
पैठण २६
पूर्व ५२
पश्चिम ६५
मध्य ३५
एकूण ३०१