पहिल्या विधासभेत औरंगाबादचे आमदार हैदराबाद राज्यातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:43 AM2019-09-27T11:43:27+5:302019-09-27T12:24:02+5:30
पहिल्याच निवडणुकीत गोविंदभाई श्रॉफ यांचा पराभव
- शांतीलाल गायकवाड
औरंगाबाद : देश स्वतंत्र झाल्यानंतर फेबु्रवारी- मार्च १९५२ मध्ये प्रथम लोकसभा व विधानसभेच्या एकत्रच निवडणुका झाल्या. तेव्हा मराठवाडा हैदराबाद राज्यात होता. त्यामुळे मराठवाड्यातून विजयी झालेले ४४ आमदार हैदराबाद राज्याच्या स्टेट असेंब्लीचे सदस्य होते. हैदराबाद राज्याच्या विधानसभेतून १९५५ पर्यंत मराठवाड्याचा कारभार चालला.
गोविंदभाई श्रॉफही मैदानात
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे जे योगदान आहे, तसेच हैदराबाद मुक्ती लढ्यात स्टेट काँग्रेसचे. परंतु स्टेट काँग्रेसच्या नेत्यांनी १९५२ ची निवडणूक प्रजा डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएफ) स्थापन करून स्वतंत्रपणे लढली. औरंगाबाद शहर मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसने (आयएनसी) श्रीपादराव लक्ष्मणराव नवासेकर यांना तर पीडीएफने गोविंदभाई श्रॉफ (गोविंददास मन्नुलाल श्रॉफ) यांना मैदानात उतरविले होते. गोविंदभाई हैदराबाद मुक्ती लढ्यातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व नावलौकिक प्राप्त तडफदार नेते होते. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली नवासेकर यांनी गोविंदभार्इंचा ३ हजार ९९ मतांनी पराभव करून आश्चर्यकारक विजयाची नोंद केली होती. नवासेकर यांना ८ हजार ९६६ तर गोविंदभार्इंना ५ हजार ८६७ मते मिळाली.
औरंगाबाद विधानसभा मतदारसंघात फक्त ५६ हजार ८८६ मतदार
औरंगाबाद विधानसभा मतदारसंघात तेव्हा फक्त ५६ हजार ८८६ मतदार होते. त्यापैकी केवळ २६.०७ टक्के अर्थात १४ हजार ८३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही सर्व मते वैध ठरली.
औरंगाबाद जिल्ह्यात ११ मतदारसंघ
तेव्हा औरंगाबाद -जालना मिळून एकच औरंगाबाद जिल्हा होता व जिल्ह्यात कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद, भोकरदन, जालना, अंबड, पैठण-गंगापूर व वैजापूर, असे ११ मतदारसंघ होते. भोकरदन व पैठण-गंगापूर या मतदारसंघातून प्रत्येकी दोन (एक राखीव, एक सर्वसाधारण) उमेदवार निवडून दिले गेले. जिल्ह्यात ५ लाख ६९ हजार ४५७ मतदार होते. जेमतेम ४० टक्के मतदारांनी हक्क बजावला.
जनसंघासह ९ पक्षांचे सर्वच उमेदवार पडले
या निवडणुकीत १५ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील भारतीय जनसंघ, अखिल भारतीय हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजा पार्टी, अखिल भारतीय रामराज्य पार्टी, आॅल इंडिया रिपब्लिकन पार्टीसह एकूण ९ पक्षांचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला नाही. काँग्रेस ९३, सोशालिस्ट पार्टी ११, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ४२, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ५, पीजंट अॅण्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडिया (पीडब्ल्यूपी) १० आणि १४ अपक्ष विधानसभेत पोहोचले.
मराठवाड्यातून काँग्रेसला २६ जागा
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. हैदराबाद राज्याची सत्ता काँग्रेसकडे आली. मराठवाड्यातील ४४ जागांपैकी २६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. १० जागेवर पीडब्ल्यूपी, ६ जागा पीडीएफ आणि २ जागा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने पटकावल्या.