Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:46 PM2019-09-27T18:46:01+5:302019-09-27T18:49:41+5:30

चहा पीत पीत होत असे उमेदवाराची निवड 

Maharashtra Assembly Election 2019: Gulmandi was once the center of politics in Aurangabad | Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र

Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देदादासाहेब गणोरकर यांच्या घरातून हालत सूत्रे

औरंगाबाद : चाळीस वर्षांपूर्वी जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे गुलमंडीवरून हलायची. राजकारणातील किंगमेकर ठरलेले दादासाहेब गणोरकर यांचे निवासस्थान त्याकाळी निवडणुकीचा अड्डा होता. रात्री उशिरापर्यंत चहा पीत कोणाला उमेदवारी द्यायची, याविषयी खलबते चालत. काँग्रेसच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांचे नेते यात सहभागी होत असत. 

कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आता त्या त्या पक्षाचे हायकमांड ठरवत असतात. मात्र, एककाळ असा होता की, जिल्ह्यातील उमेदवार कोण हे येथील शहर, जिल्हा समितीच ठरवत असे. १९६० ते १९८० च्या दरम्यान दादासाहेब गणोरकर राजकारणात पॉवरफूल होते.  पत्रकार म्हणून काही वर्षे त्यांनी कामही केले. त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले. काँग्रेसचे शहर, जिल्हा समितीचे सरचिटणीसपदही त्यांनी भूषविले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी कोणतेही पद घेतले नाही. जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणूनच त्यांनी आपली भूमिका बजावली. त्यावेळेस शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे गुलमंडी होता आणि याच गुलमंडीवर गणोरकरांचे दुसऱ्या मजल्यावर निवासस्थान होते. तिथे समोरील बाजूस एक मोठी खोली होती. तिथे खिडकीत उभे राहिले की, संपूर्ण गुलमंडीचा चौक दिसत असे. हेच खोली त्यांची कार्यालय बनले होते.

याच ठिकाणी रात्री ९ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार येऊन बसत असत. जिल्ह्याचे राजकारणाची दिशा येथूनच ठरविली जात असे. येणाऱ्या प्रत्येकाला त्यावेळीस समाधान हॉटेल किंवा मेवाड हॉटेलमधून चहा आणला जात होता. रात्री उशिरापर्यंत चहा मिळत होता. चहापीत या ठिकाणी करमणुकीसाठी कधी कधी पत्त्याचे डावही रंगत असत. येथेच निवडणुकीच्या काळात उमेदवार ठरविला जात असे. काँग्रेसच्या शहर व जिल्हा समितीने ठरविलेल्या उमेदवार मग पक्षश्रेष्ठी त्यावर शिक्कामोर्तब करीत असत. त्याकाळात दादासाहेब गणोरकरांचा शब्द अंतिम मला जात होता असे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक. ना.वी. देशपांडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यावेळेस गुलमंडीवर सर्व पक्षाचे नेतेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्रीही येत असत. ते आवर्जून गणोरकरांच्या निवासस्थान वजा कार्यालयात जात असत. त्यांची भेट घेतल्यानंतर गुलमंडी, राजाबाजार, शहागंज, सरस्वती भुवनच्या मैदान, एमपी लॉ कॉलेज किंवा आमखासच्या मैदानावर जाहीर सभा घेतली जात असे. त्यावेळीस काही बोटावर मोजण्याइतकेच लोकांकडे टेलिफोन असत त्यातील एक गणोरकर होते. त्यांच्याकडील फोन सतत खणखणत असतात.

राजकीय महत्त्वाचे निर्णय असले तर त्यांच्याच फोनवर सांगितला जात असे. यामुळे गणोरकरांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी जमत असत. त्याकाळात अनेकदा याच ठिकाणी पत्रकारांना हेडलाईन मिळत असत. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण त्या नंतर शरद पवारही खास गुलमंडीवर येऊन गेले होते. माजी मंत्री रफिक झकेरिया, अब्दुल आजीम, बाळासाहेब पवार, साहेबराव पाटील डोणगावकर, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह मराठवाड्यातील आमदार, खासदारही गुलमंडीवरील बैठकीत सहभागी होत असे. त्यावेळेस घनश्याम पानवालेचे पान प्रसिद्ध असे. रात्रीतून ५० पेक्षा अधिक पानांची आॅर्डर दिली जात होती. गणोरकरांची बैठकीत राजकीय गप्पाना उधाण येत असे. मात्र, १९८० नंतरच्या काळात त्यांनी हळूहळू राजकरणातून आपले अंग काढून घेतले आणि गुलमंडीवरचे राजकारणाचे केंद्र अन्यत्र सरकले. 

आदल्या रात्रीच ठरत असे दुसऱ्या दिवशीचे पवित्रे
गुलमंडीवरील दादासाहेब गणोरकरांचे निवासस्थान म्हणजे जिल्ह्यातील राजकारणाचे मुख्य केंद्र होते. येथे स्वातंत्र्यसैनिकच नव्हे तर सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते येऊन बसत असे. रात्री ९ वाजेनंतर शहरातील व्यापारीही या बैठकीत सहभागी होत असे. चहा पीत गप्पा रंगत असे. दुसऱ्या दिवशीचे जिल्ह्यातील राजकारणाची दिशा आदल्या रात्री याच बैठकीत ठरविली जात होती. त्यावेळीस औरंगाबाद शहराचा आकारही मर्यादित होता. 
- ना. वि. देशपांडे, स्वातंत्र्यसैनिक

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Gulmandi was once the center of politics in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.