Maharashtra Assembly Election 2019 : तुम्ही 'शाह' असलात, तरी संविधानच बादशाह; ओवेसींचा अमित शहांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:14 PM2019-10-03T12:14:34+5:302019-10-03T12:18:56+5:30
गांधींची हत्या करणारे आज श्रद्धांजली अर्पण करताहेत
औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारेच आज देशभरात त्यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहेत.मॉब लिंचिंगमध्ये झारखंड येथे तबरेज अन्सारीची हत्या करणारेही नथुराम गोडसेचे वंशज होते, तुम्ही 'शाह' असाल मात्र संविधान बादशाह आहे, असा हल्ला मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावरील जाहीर सभेतून चढविला. गांधींची विचारधारा समजून घ्या, हिंदू-मुस्लिमांच्या एकतेसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले, ट्रम्प साठी मोदी राष्ट्रपिता असतील पण माझ्यासाठी महात्मा गांधी हेच राष्ट्रपिता आहेत असेही ओवेसी यांनी नमूद केले.
ओवेसी यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीचा औरंगाबाद जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडला. पैठण येथील सभा संपल्यावर त्यांनी सायंकाळी आमखास मैदानावरील सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर खा. इम्तियाज जलील यांच्यासह विधानसभेचे उमेदवार अरुण बोर्डे, नासेर सिद्दीकी, डॉ. गफ्फार कादरी, जावेद कुरैशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल ४२ मिनिटे ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी हत्येपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. खाजा कुतबोद्दीन बख्तियार यांची दर्गाह पुन्हा बांधावी, मुस्लिमांवरील होणारे अत्याचार थांबवावेत, अशी त्यांची मागणी होती. त्यांची हत्या गोडसेनी केली. गोडसेची विचारधारा जपणाऱ्यांच्या तोंडी आज गांधींचे नाव शोभत नाही. गांधींची विचारधारा अगोदर समजून घ्या. गोडसेच्या विचारांमुळेच झारखंडमध्ये निष्पाप तबरेज अन्सारीची हत्या झाली. ही हत्या करणारे गोडसेचे वंशजच आहेत. भाजप, आरएसएसवर चौफेर टीका करीत एक नवीन भारत निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अच्छे अच्छे आये और गये...
खा. इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘अच्छे अच्छे आये और गये...’ मजलीसला तोडण्याचा प्रयत्न केल्यास तेवढ्याच ताकदीने ती उभी राहील. मध्य मतदारसंघातील वादग्रस्त उमेदवारीच्या मुद्यावर ते म्हणाले की, पक्षप्रमुखांनी रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या नागरिकाला उमेदवारी दिली तरी आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
जावेद कुरैशी समर्थकांचा गोंधळ
गफ्फार कादरी यांचे भाषण सुरू असतानाच स्टेजच्या समोर काही तरुण जावेद कुरैशी, असदुद्दीन ओवेसी यांचे पोस्टर झळकावू लागले. कुरैशी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. याचवेळी कुरैशी यांची स्टेजवर एन्ट्री झाली. त्यांनी माईकचा ताबा घेऊन तरुणाईला शांत केले. ओवेसी यांचे भाषण सुरू झाल्यावरही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली. घोषणा न थांबविल्यास मी खाली येईन, असा सज्जड दम त्यांनी भरला.