Maharashtra Assembly Election 2019 : यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:15 PM2019-10-02T13:15:44+5:302019-10-02T13:19:59+5:30
आतापर्यंतच्या इतिहासात विरोधकांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झालेली आहे.
औरंगाबाद : भाजप- शिवसेनेसह इतर मित्र पक्षांची युती झालेली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात तुम्ही सर्वांनी मेहनत करून अतुल सावे यांना निवडून द्यावे. त्यांना अगोदर राज्यमंत्री केले. आता मी कॅबिनेट मंत्री करतो, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारांना केले.
भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये राज्यमंत्री अतुल सावे यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, शिवसेना आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, ‘रिपाइं-ए’चे बाबूराव कदम, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी दानवे म्हणाले की, भाजप-शिवसेनेची मागील ३० वर्षांत फक्त एकदाच युती तुटलेली आहे. आता युतीची घोषणा करण्यात आल्यामुळे राज्यात २२५ जागा निवडून येणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात विरोधकांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झालेली आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाली तरीही अनेक आमदार भाजपत येण्यास तयार आहेत. आज सकाळीच दोन आमदार भेटून विनवणी करीत होते. मात्र, शिवसेना- भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना पक्षात प्रवेश दिला नाही. निष्ठावंतांनाच न्याय देण्याचा निर्णय घेतला. युतीतील पक्ष हे विचारांना बांधलेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद पूर्वमध्ये विजय निश्चितच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाची घौडदौड सुरू आहे. मोदींनी जगभर फिरून भारतात गुंतवणूक आणली. त्यातील ३५ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासासाठी गुंतवणूक महत्त्वाची असून, समृद्धीसारखा महामार्ग बनवला आहे. आणखी विकास करण्यासाठी अतुल सावेंना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अतुल सावे, आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, रिपाईचे बाबूराव कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.
पूर्वसह मध्य व पश्चिमकडेही लक्ष द्या
शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मित्रपक्षाच्या उमेदवाराचे काम करणार आहेत. मात्र, केवळ पूर्वकडे पाहून चालणार नाही, तर शहरातील शिवसेना लढवत असलेल्या पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघांकडेही भाजपला लक्ष द्यावे लागेल, असे स्पष्ट केले.