Maharashtra Assembly Election 2019 : एमआयएमचे शहरातील ३ उमेदवार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:59 PM2019-09-28T18:59:20+5:302019-09-28T19:01:01+5:30
सोशल मीडियावर रंगले वॉर
औरंगाबाद : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सायंकाळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. मध्य विधानसभा मतदारसंघातून जावेद कुरैशी यांचा पत्ता कट करून माजी गटनेते तथा नगरसेवक नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली. पश्चिम विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचे पती अरुण बोर्डे यांना तर पूर्वमध्ये पुन्हा एकदा डॉ. गफ्फार कादरी यांना उमेदवारी देण्यात आली. मध्य विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडाळी होण्याची शक्यता आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मध्य’ मतदारसंघात सेना-भाजपच्या मतांचे उघडपणे विभाजन झाले होते. याचा थेट फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज जलील या मतदारसंघातून निवडून आले होते. आता ते खासदार झाल्याने या विधानसभा मतदारसंघावर अनेकांचा डोळा होता. एमआयएमकडे ३० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. स्थानिक पातळीवर उमेदवाराची निवड करणे अशक्यप्राय होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उमेदवारीचा चेंडू ओवेसी यांच्या कोर्टात टोलावला होता. शुक्रवारी सायंकाळी ओवेसी यांनी टिष्ट्वट करून शहरातील तिन्ही उमेदवारांची घोषणा केली.
पूर्व आणि पश्चिमच्या उमेदवारीवरून पक्षात फारसा वाद उफाळला नाही. मात्र, मध्य विधानसभेच्या मुद्यावरून तरुणाईने थेट ओवेसी यांच्या फेसबुक अकाऊंटवर जाऊन नाराजी दर्शविली आहे. अत्यंत चुकीचा, दुर्दैवी निर्णय असून, कुरैशी यांच्यावर अन्याय करणारा असल्याचे अनेक नेटिझन्सनी म्हटले आहे.एमआयएम पक्षाला शहरात उभे करण्यात जावेद कुरैशी यांचा सिंहाचा वाटा होता. अलीकडे ते पक्षापासून दुरावले होते. लोकसभा निवडणुकीत ओवेसी यांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन त्यांना पक्षात आणले. विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुनर्वसन होईल, असा अंदाज होता. ऐनवेळी पक्षानेही त्यांचा पत्ता कट केला.
अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार
एमआयएम पक्षाकडे तिकीट मागणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांनी मध्य विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारीही सुरू केली होती. काहींनी तर संपर्क कार्यालयेही उघडली आहेत. उमेदवारी मिळो किंवा न मिळो, निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार नाही, असा मनोदय अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही बंडाळी थोपविणे एमआयएम पक्षासाठी मोठे आव्हान असणार आहे.
पक्षाची कोअर कमिटी शहरात
ओवेसी यांनी उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीला गुरुवारी शहरात पाठविले. कालपासून या कमिटीच्या सदस्यांनी गोपनीय पद्धतीने शहरात भेटीगाठी सुरू केल्या होत्या. कमिटीच्या सूचनेनुसारच पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला असावा, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.