सेनेचे ठरल...'औरंगाबाद मध्य'मधून पुन्हा प्रदीप जैस्वाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 02:03 PM2019-10-01T14:03:12+5:302019-10-01T14:46:30+5:30
मागील निवडणुकीत हा बालेकिल्ला एमआयएमने हिसकावून घेतला.
औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीतर्फे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांना शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. जैस्वाल रविवारपासून मुंबईत तळ ठोकून होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू केली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या मत विभाजनाचा फायदा नवख्या एमआयएम पक्षाने घेतला होता. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघावर जैस्वाल यांनी अनेक वर्षे अधिराज्य गाजविले आहे. २००९ मध्ये तर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली होती. कधीकाळी हा सेनेचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीत हा बालेकिल्ला एमआयएमने हिसकावून घेतला. सेनेच्या बालेकिल्ल्यावर परत एकदा भगवा फडकविण्यासाठी सेना सज्ज झाली आहे. भाजपकडून किशनचंद तनवाणी यांनीही ‘समांतर’तयारी ठेवली होती. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवून तनवाणीही चांगलेच पोळले आहेत. त्यामुळे युतीमध्ये मध्य मतदारसंघ भाजपला सुटल्यास निवडणूक लढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. अलीकडेच ते सेनेत जाण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती.
रविवारपासून मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रदीप जैस्वालही मुंबईतच तळ ठोकून होते. सेनेतील इतर इच्छुकांनाही मातोश्रीत बोलावण्यात आले. आमच्यातील कोणालाही उमेदवारी दिल्यास आक्षेप राहणार नाही, असे इच्छुकांकडून लिहून घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.दरम्यान, प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले होते.
एमआयएमची अग्निपरीक्षा
औरंगाबाद मध्य मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने एमआयएम पक्षाने यश मिळविले होते, तसेच सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या पक्षात उमेदवारीवरून प्रचंड धुसफूस सुरू आहे. जावेद कुरैशी तलवार म्यान करण्यास तयार नाहीत. त्यांचे बंड थोपविण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २ आॅक्टोबरला पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी शहरात येणार आहेत. या दौऱ्यात ते कुरैशी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.