महिलांनी समस्यांचा पाढा वाचताच 'माऊली... माऊली' म्हणत आदेश भाऊजींनी दिली बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 04:44 PM2019-09-26T16:44:54+5:302019-09-26T17:00:48+5:30
मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते, तरी कुणी नाव ठेवले नसते
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिलांची मते मिळविण्यासाठी शिवसेनेने बुधवारी पक्ष सचिव आदेश बांदेकर (भाऊजी) यांचा ‘माऊली संवाद’ कार्यक्रम ठेवला खरा; पण शहरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज यासह विविध समस्या सुटत नसल्याने महिलांनी प्रश्नांचा जोरदार भडिमार केला त्यामुळे भाऊजींवर केवळ ‘माऊली... माऊली...’ असे उत्तर देऊन प्रश्नांना बगल देण्याची वेळ आली.
महिलांच्या समस्यांचे गाºहाणे ऐकून आदेश बांदेकर यांनी नंतर उपस्थित शिवसेना नेत्यांचे कान टोचले. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधांकडे जरी शिवसेनेने लक्ष दिले असते तरी कुणी नाव ठेवले नसते. आगामी काळात जे आमदार निवडून येतील, त्यांनी या सुविधांकडे लक्ष दिले, तर शिवसेनेला कुणीही नाव ठेवणार नाही, असे सांगितले.
श्रीहरी पॅव्हेलियन येथे विधानसभा निवडणुकीनिमित्त बांदेकर यांच्या उपस्थितीत महिलाकेंद्रित ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थिती होती. सव्वातासाच्या संवाद कार्यक्रमात बांदेकर यांनी महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र महिलांनी समस्यांचा एवढा भडिमार केला की बांदेकर यांना विनोदी उत्तरे द्यावी लागली.
खासदार तुमचे होते, आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. तरीही काही कामे केली नाहीत, असा प्रश्न नाईकनगर सातारा परिसरातील महिलेने उपस्थित केला. बांदेकर यांनी याप्रकरणी थेट उत्तर देणे टाळले. खैरे यांनी रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल, असे सांगून वेळ मारून नेली. कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर, अनिता मंत्री, नलिनी महाजन, सुनंदा खरात, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, प्राजक्ता राजपूत, दुर्गा भाटी, लक्ष्मी नरहिरे, नलिनी बाहेती, मीरा देशपांडे, जयश्री घाडगे आदींची उपस्थिती होती.
पश्चिम मतदारसंघात समस्यांचा पाढा
पश्चिम मतदारसंघातील अनेक समस्या महिलांनी मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीजपुरवठा आदी समस्यांचा पाढाच महिलांनी वाचला. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातून जास्तीच्या महिला कार्यक्रमाला आल्या होत्या. २५ दिवस राहिले आहेत. आ. शिरसाट यांना ताकद द्या, अशी साद घालीत बांदेकर यांनी खेळी-मेळीच्या वातावरणात संवाद साधून अनेक महिलांच्या प्रश्नांना ‘माऊली-माऊली’ करीत बगल दिली.
महिला विचारतात ‘ताई’ आमचे काय?
महिला आघाडीची एक पदाधिकारी बांदेकर यांना म्हणाली, प्रचार करण्यासाठी आम्ही जेव्हा महिला कार्यकर्त्यांना सोबत चला म्हणतो, तेव्हा त्या महिला म्हणतात, ‘ताई’ आमचे काय? प्रचारात आमचा वेळ जातो. त्याचे आम्हाला काहीही मिळत नाही. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी, झुणका-भाकर केंद्रासारखी योजना पुन्हा सुरू करावी. जेणेकरून पक्षाचे काम करणाऱ्या महिलांना उभारी मिळेल. यावर सचिव बांदेकर म्हणाले, इच्छाशक्तीने काम केल्यास सर्व काही मिळते. झुणका- भाकर केंद्र योजनेचा मुद्दा पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.