Maharashtra Assembly Election 2019 : शिवसेनेतील इच्छुकांची आज मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:19 PM2019-09-28T12:19:28+5:302019-09-28T12:20:34+5:30
युतीबाबत कल जाणून घेण्याची शक्यता
औरंगाबाद : शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शनिवारी सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११ वा. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे. भाजपने शिवसेनेला देऊ केलेल्या जागा मान्य आहेत की नाही, युती करायची की नाही, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्याच्या बैठकीत राज्यातील सर्व इच्छुकांचा कल जाणून घेतील, अशी शक्यता आहे.
या बैठकीला जिल्ह्यातून ज्यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या, ते सर्व उपस्थित राहणार आहेत. बैठकीला हजेरी लावण्यासाठी शुक्रवारी रात्री इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी मुंबईला रवाना झाले. बैठकीचे रूपांतर मेळाव्यात होणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि ज्यांनी शिवसेना भवन येथे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या. त्यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
कल जाणून घेण्याची शक्यता
भाजपकडून शिवसेनेला सध्या १२६ जागा देण्याची आॅफर देण्यात आली आहे.भाजप १४४ जागांवर लढेल आणि मित्र पक्षाला १८ जागा देईल. शिवसेनेने गेल्यावेळी जवळपास सर्वच जागा लढल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या हाती ६३ जागा लागल्या होत्या. १२६ पैकी किती जागा जिंकता येतील, याचा अंदाज शिवसेना सध्या लावत आहे. इच्छुक आणि आयारामांचे समाधान होत नसेल तर युतीचा निर्णय घ्यायचा की नाही, याबाबतचा कल शिवसेना बैठकीतून जाणून घेणार आहे.