शिवसेनेतील इच्छुक पोहोचले मातोश्रीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:04 PM2019-09-24T12:04:25+5:302019-09-24T12:10:17+5:30
युतीसाठी विद्यमानांचे देव पाण्यात
औरंगाबाद : शिवसेनेतील इच्छुकांची मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले असून, भाजपसोबत युती होणार की नाही, याबाबत पक्षातील नेत्यांकडून माहिती घेत असल्याचे सेनेच्या गोटातून समजले आहे. युती झाली तरी काही जणांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाच्या वाटाघाटीत मतदारसंघ इच्छुकांच्या वाट्याला आला नाही, तर त्यांनी लढण्यासाठी कंबर कसली आहे.
मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर युतीची घोषणा होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपमधील विद्यमान आमदारांना युती व्हावी, असे वाटते आहे, तर तशीच भूमिका शिवसेनेच्याही विद्यमान आमदारांची आहे. विद्यमान आमदारांनी युती होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. युती झाली तरी शिवसेनेतील काही इच्छुक ‘मातोश्री’च्या कानावर घालून अपक्ष मैदानात उतरण्यासाठी परवानगी कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे वृत्त आहे.
वैजापूर, पश्चिम आणि मध्य मतदारसंघ भाजपने शिवसेनेकडून मागितल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. त्या मोबदल्यात सिल्लोड, गंगापूर व अन्य एक मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेला मिळावा. यासाठी पूर्णत: राजकीय वाटाघाटी सुरू आहेत. या सगळ्या तर्कवितर्काच्या माहितीमुळे जिल्ह्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला ३, भाजपला ३, एमआयएमला १ आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसेला प्रत्येकी १ जागेवर यश मिळाले होते. २०१४ साली युती तुटली होती. ९ पैकी ३ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल व इतर सहा ते सात जणांत उमेदवारीसाठी स्पर्धा आहे, तर भाजपकडूनही कि शनचंद तनवाणी व अन्य दोघांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे.
जिल्ह्यात सध्या अशी सुरू आहे चर्चा
- शहरातील पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री अतुल सावे भाजपचे उमेदवार असणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून राजू वैद्य अपक्ष लढण्याच्या तयारत आहेत.
- पश्चिममध्ये आ. संजय शिरसाट यांना शिवसेनेने उमेदवारी दिली, तर राजू शिंदे किंवा बाळासाहेब गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.दोघांनीही आपली संवाद यात्रा सुरू केली आहे.
- मध्यमध्ये शिवसेनेने जैस्वाल यांना उमेदवारी दिली, तर तनवाणी समर्थकांशी चर्चा करून पुढे जाणार आहेत.
- सिल्लोडची जागा माजी आ. सत्तार यांना सुटल्यास भाजपचे सुरेश बनकर लढतील, असे चित्र आहे.
- गंगापूरची जागा भाजपकडे गेली, तर आ. प्रशांत बंब यांच्या विरोधात शिवसेना पुरस्कृत अपक्ष मैदानात असेल.
- वैजापूर,कन्नड, पैठण मतदारसंघातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.