Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 03:07 PM2019-09-27T15:07:32+5:302019-09-27T15:17:40+5:30
जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रे आहेत.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी आज २७ सप्टेंबरपासून अर्ज घेण्याची व दाखल करण्याची सुरुवात होत आहे. सकाळी ११ ते ३ वाजेदरम्यान जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी दाखल करता येईल. ४ आॅक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रात एकूण ३ हजार २४ मतदान केंद्रे आहेत.
यात २ हजार ९५७ मूळ मतदान केंद्रे, तर ६७ सहायकारी मतदान केंद्रे आहेत. २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार असून, २१ आॅक्टोबर मतदानाची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या तारखेपासून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ३ हजार ६० पुरुष, १३ लक्ष ४६ हजार ६६९ महिला व इतर २६ असे एकूण २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांची नोंदणी ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत करण्यात आलेली आहे. १६ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ५ आॅक्टोबर रोजी होईल. ७ आॅक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे. २४ आक्टोबर रोजी मतमोजणीचा कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे.
निवडणूक निर्णय कार्यालय येथे
- सिल्लोड- उपविभागीय कार्यालय कोर्ट हॉल,
- कन्नड- तहसील कार्यालय, फुलंब्री- मेल्ट्रॉन कंपनी, चिकलठाणा,
- औरंगाबाद मध्य - शासकीय तंत्रनिकेतन उस्मानपुरा,
- औरंगाबाद पश्चिम - शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय, उस्मानपुरा,
- औरंगाबाद पूर्व- जिल्हा समादेशक कार्यालय एन-१२,
- पैठण- तहसील कार्यालय,
- गंगापूर- तहसील कार्यालय,
- वैजापूर- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर
पश्चिम मतदारसंघात ३४२ मतदान केंद्रे
विधानसभा मतदारसंघ क्र.१०८ पश्चिम हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. मतदारसंघात ३४२ मतदार केंद्र आहेत. यात ३३६ मूळ तर ६ सहायक केंद्रे आहेत. या मतदारसंघात एकूण ३ लाख ३५ हजार ५९ एवढी मतदारांची संख्या आहे. यात १ लाख ७८ हजार ८३ पुरुष, तर १ लाख ५६ हजार ४६३ महिलांचा समावेश आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल स्वीकारण्यात येणार आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात अर्ज दाखल करता येतील. अशी माहिती औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली. कर्मचाऱ्यांना २७ सप्टेंबर रोजी पहिले व दुसरे प्रशिक्षण २० आॅक्टोबर रोजी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.