वैजापूर मतदारसंघ सेनेकडेच; रमेश बोरणारे यांना उमेदवारी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 06:18 PM2019-09-30T18:18:09+5:302019-09-30T18:20:41+5:30
भाजपाने केला होता मतदारसंघावर दावा
- मोबीन खान
वैजापुर : शिवसेनेचा गड असलेल्या वैजापुर विधानसभेवर ‘भगवा’ फडकविण्यासाठी शिवसेनेने तालुका अध्यक्ष रमेश बोरणारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. युतीच्या औपचारिक घोषणेपूर्वीच शिवसेनेने सोमवारी काही उमेदवारांची यादी जाहीर केली.त्यात बोरणारे यांचा समावेश आहे.त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून दावा केलेल्या भाजपचा हिरमोड झाला आहे.दरम्यान, तालुक्यातून पहिला उमेदवारी अर्ज शिवसेनेचा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेले काही दिवस वैजापुर मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपला असे वातावरण होते. तसेच २०१४ मध्ये सेना भाजपने ही जागा स्वतंत्र लढली होती. या पार्श्वभूमीवर 'भाजपा'ने या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. दरम्यान, सेनेतील एका गटाने बोरणारे यांच्या उमेदवारीला विरोध केले होते.मात्र, बोरणारे यांच्यावरच विश्वास दाखवित ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म हातात देत 'पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडून या' असे म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिवसेनाच नाही तर भाजपच्याही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, वैजापुर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व मागील ५ वर्षांपासून राष्ट्रवादीचे आ.भाऊसाहेब पाटिल चिकटगावकर हे करत आहेत. मात्र, यावेळी त्यांचे पुतणे अभय पाटिल चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी करून काका समोरच आव्हान उभे केले आहे.त्यामुळे विधमान आ.चिकटगावकर यांची उमेदवारी अजूनही ठरलेली नाही.आ.चिकटगावकर कधी भाजप,तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांची नावे त्यांच्यासोबत जोडली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आ. चिकटगावकर हे मुंबईत तळ ठोकून आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नुसताच गुलाल आम्हीच उधळणार, असा दावा करीत आहेत.
भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ च्या तळ्यात-मळ्यातील भूमिकेमुळे ते सध्या येथील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.गेल्या काही दिवसापासून डॉ.परदेशी यांचे नाव शिवसेना पक्षासोबत जोडली जात होती. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कुणाला रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या एक-दोन दिवसात याबाबत घोषणा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तूर्तास तरी वैजापुरातुन राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.