'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 05:37 PM2019-09-26T17:37:24+5:302019-09-26T17:40:56+5:30

शिवसेना गड परत मिळविण्याचे प्रयत्न करणार

Maharashtra Assembly Election 2019 : Whatever the candidate for 'Aurangabad Central', the fight will be multi-faceted | 'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

googlenewsNext
ठळक मुद्देएमआयएम तुल्यबळ उमेदवाराच्या शोधातराष्ट्रवादी काँग्रेसला आले बळ

औरंगाबाद : शिवसेनाचा अभेद्य गड असलेल्या मध्य विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत एमआयएमने सुरुंग लावला. सेना यंदा आपला गड परत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. एमआयएम मागील निवडणुकीतील सातत्य यंदाही परत राखता येईल का, यादृष्टीने उमेदवाराची चाचपणी करीत आहे. राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष हा फॅक्टरही निवडणुकीत प्रभावीपणे काम करणार आहे. युती न झाल्यास भाजपचा उमेदवार असणार आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित नसले तरी येथे बहुरंगी लढत अटळ आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपने युती केली नव्हती. मत विभाजनाचा थेट फायदा एमआयएमला झाला होता. यंदाही मत विभाजन अटळ असल्याचे बोलले जात आहे. कालपर्यंत एमआयएमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी होती. ही आघाडी आज सोबत नाही. त्यामुळे एमआयएमच्या दृष्टीने ही कमकुवत बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात मुस्लिम चेहरा देणार आहे. त्यामुळे मतदारसंघ परत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी एमआयएमची बरीच दमछाक होणार आहे. 

सेनेच्या गोटात काय?
सेनेकडून प्रदीप जैस्वाल, सुहास दाशरथे, बाळू थोरात यांच्यासह ऐनवेळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. प्रशांत किशोर यांनी सेनेसाठी केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात महापौरांना नागरिकांनी पसंती दिल्याचे बोलले जात आहे. ‘मातोश्री’ने नवीन खेळी केल्यास मराठा आरक्षणाचे नेते विनोद पाटीलही संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. उमेदवारीचा कौल कोणाच्या बाजूने लागेल हे निश्चित नसले तरी सर्व काही इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. पितृपक्ष संपताच उमेदवारीची घोषणाही होणार आहे.

एमआयएम तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात
एमआयएम पक्षाला इम्तियाज जलील यांच्या माध्यमाने एक तुल्यबळ उमेदवार २०१४ मध्ये मिळाला. असाच उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. निवडणुकीत सेना-भाजप, राष्ट्रवादी, अपक्षांवर मात करील असा उमेदवार कोण, याचा अत्यंत बारकाईने पक्षाकडून शोध घेतला जात आहे. पक्षातील ३० पेक्षा अधिक इच्छुक यंदाही एमआयएमच्या लाटेवर स्वार होण्यासाठी उत्सुक आहेत. एमआयएमचे वादळ रोखण्यासाठी बंडखोरांसह राष्ट्रवादी, अपक्ष हा फॅक्टर प्रभावीपणे काम करणार आहे. सेनेकडून मिळविलेला मतदारसंघ यंदा परत आपल्याकडे ठेवणे हे एमआयएमसाठी सोपे नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसला आले बळ
शरद पवार यांनी औरंगाबादेत घेतलेला मेळावा आणि ईडीने दाखल केलेला गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मध्य विधानसभेत नवसंजीवनी देऊ शकतो. शरद पवार यांच्या पाठीशी तरुणाई अत्यंत खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मध्य विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार कदीर मौलाना यांना बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास शरद पवार अत्यंत नवीन चेहऱ्यालाही संधी देऊ शकतात.

भाजपकडून ‘समांतर’ तयारी
सेनेसोबत युती न झाल्यास भाजपला मध्यच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मागील एक महिन्यापासून भाजप बुथनिहाय, मतदार यादीनिहाय कामाला लागला आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि प्रदेश चिटणीस अनिल मकरिये यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत भाजपने केलेल्या चुका यंदा होणार नाहीत, याची काळजी पक्षाकडून घेतली जाईल, असे दिसते. हा मतदारसंघ मिळावा, यासाठीही प्रयत्न चालू आहेत. 

‘वंचित’कडून कामही सुरू
मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसुद्धा उमेदवार देणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक अमित भुईगळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. भुईगळ यांनी कामालाही सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे एमआयएम आणि वंचितमध्ये युती होण्याची चिन्हे नाहीत.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Whatever the candidate for 'Aurangabad Central', the fight will be multi-faceted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.