एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:23 PM2019-09-24T12:23:03+5:302019-09-24T12:25:40+5:30
औरंगाबाद मध्यमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागला कामाला
औरंगाबाद : मध्य विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेना-भाजपमधील मतांच्या विभाजनाचा फायदा नवोदित एमआयएम पक्षाला झाला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे वादळ रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी मुस्लिम उमेदवाराला संधी देणार आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीला या मतदारसंघात निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.
मागील दहा वर्षांमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघात राजकीय ‘रंग’बदलले आहेत. कधीकाळी हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेले प्रदीप जैस्वाल यांनी शहर प्रगती आघाडीची स्थापना करून निवडणूक लढविली. जैस्वाल यांना सेना-भाजपसह इतरांनीही भरभरून मतदान केले होते. त्यामुळे त्यांनी सेनेचे उमेदवार विकास जैन यांचा दारुण पराभव केला होता. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कदीर मौलाना होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमच्या विरोधात विनोद पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांना अवघ्या दहा हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. कारण १०० टक्के मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी उभे होते.
मागील पाच वर्षांमध्ये एमआयएमचा आलेख झपाट्याने खालावला आहे. पूर्वीसारखे वादळ यंदा राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम चेहरा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात कदीर मौलाना यांना उमेदवारीचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यानुसार मौलाना कामाला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघात भेटीगाठींवर सर्वाधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वी मध्य मतदारसंघातील बुढीलेन या मनपाच्या वॉर्डात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएम उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला हळूहळू वाढत आहे. एमआयएमकडे असलेला हा विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे.
युतीकडून यंदा कोण?
शिवसेना-भाजप युतीचे अद्याप निश्चित नाही. युतीचा उमेदवार नेमका कोण हेसुद्धा गुलदस्त्यात आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे आहे. सेनेकडून प्रदीप जैस्वाल उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. सेनेकडून आणखी काही इच्छुकांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. युती न झाल्यास भाजपकडून पुन्हा एकदा किशनचंद तनवाणी निवडणूक रिंगणात दिसून येतील. अशा परिस्थितीत मतदारांची मोठी परीक्षा राहणार आहे.
एमआयएम शेवटी पत्ते उघडणार
मध्य मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी एमआयएम पक्ष प्रयत्न करणार आहे. या मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षासमोर मोठा पेच आहे.३० इच्छुकांपैकी एकाची पक्षाला निवड करावी लागणार आहे. जावेद कुरैशी यांची वर्णी पक्षाकडून लावण्यात येऊ शकते. सर्वात शेवटी औरंगाबाद मध्यचा उमेदवार एमआयएम घोषित करणार आहे.
२००९ मध्ये मध्यची स्थिती :
उमेदवार एकूण मते
प्रदीप जैस्वाल ४९,९६५
अ. कदीर मौलाना ४१,५८१
विकास जैन ३३,९८८
२०१४ मध्ये मध्यची स्थिती :
उमेदवार एकूण मते
इम्तियाज जलील ६१,८४३
किशनचंद तनवाणी ४०,७७०
प्रदीप जैस्वाल ४१,८६१
विनोद पाटील ११,८४२