"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:20 PM2024-11-19T13:20:23+5:302024-11-19T13:30:15+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Ambadas Danve alleged that money is being distributed to voters | "कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO

"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar : मतदानाला आता काहीच तास उरले असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांव आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी पैसे वाटप होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याआधी बोटाला शाई लावून, वोटिंग आणि आधार कार्ड ताब्यात घेऊन पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता अंबादास दानवेंनी पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आणला आहे. पश्चिम मतदार संघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

व्हिडीओमध्ये एका घरात पाच ते सहाजण बसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये देवळाई तांडा येथील माजी नगरसेवक असल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय शिरसाटांची धनुष्यबाणाची सीट निवडून आली की भैय्याच्या ऑफिसमध्ये नेऊन पाण्याची नळ आणायची माझी जबाबदारी असेल. पण मतदान एकजुटीने करा, असं व्हिडीओतील एक व्यक्ती म्हणताना दिसत आहे. तर पैसे वाटणारी व्यक्ती तुमची किती मते ८ मतं तर हे घ्या चार हजार रुपये असं बोलताना दिसत आहे. 

व्हिडीओ पोस्ट करताना अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाला देखील टॅग केले आहे."आता यापेक्षा मोठा पुरावा भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना कोणता हवा! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?," असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.

दरम्यान, याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच मतदानाच्या दिवशी ५०० रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.याप्रकरणी जवाहरनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Ambadas Danve alleged that money is being distributed to voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.