"मरेपर्यंत पस्तावशील"; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:55 PM2024-11-09T12:55:18+5:302024-11-09T12:58:09+5:30

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Gangapur MLA Prashant Bamb meeting has once again become chaotic | "मरेपर्यंत पस्तावशील"; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी

"मरेपर्यंत पस्तावशील"; आश्वासनांवरुन प्रश्न विचारताच प्रशांत बंब यांची तरुणांना धमकी

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. एका गावातल्या तरुणांनी विकासकामांसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर आमदार प्रशांत बंब चांगलेच संतापले. प्रशांत बंब यांनी कार्यकर्त्यांना तरुणांना सभेतून बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी आमदार बंब यांनी तरुणांना धमकावण्याचा प्रयत्न केला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत अशी दमदाटी पक्षाच्या शिबिरात शिकवली जाते का? असा सवाल केला आहे.

महायुतीचे गंगापूर- खूलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदारांना पुन्हा एकदा धमकावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गवळी शिवारा गावात दोन तरुणांनी आमदार प्रशांत बंब यांना रेल्वे संदर्भातील दिलेल्या आश्वासनावरुन प्रश्न विचारले. त्यावरुन संतप्त झालेल्या प्रशांत बंब यांनी तरुणांना शांत बसण्यास सांगितले. मात्र तरीही तरुणांनी मागच्या वेळी जे आश्वासन दिलं तेच पुन्हा देताय, १५ वर्ष झाली, असं म्हटलं. त्यावर बंब यांनी नाही पटलं तर मत नको देऊ असं सांगितले. त्यानंतरही तरुण आपलं म्हणणं मांडत राहिले. 

त्यामुळे प्रशांत बंब यांचा पारा आणखी चढला. मी इथे नसलो तर तू पस्तावशील इतके हे लोक तुझी हालत खराब करतील. मरेपर्यंत पस्तावशील. तू आता दादागिरी करतोय. बसं झालं यांना आता मागे घ्या, असं प्रशांत बंब म्हणाले. त्यानंतर बंब यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये आणि गावातील इतर तरुणांमध्ये धक्काबुक्की झाली.

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते विरोधी पक्षाच्या लोकांना खुल्या चर्चेचे आमंत्रण देत फिरतात. मग एक सामान्य माणूस चर्चेला आला की त्याला असं धमकवायचं आणि माणसं अंगावर सोडायची, हे भाजपच्या आमदाराला शोभते का? काय प्रशांत बंब, लोकांना उत्तर देता येत नाही की ही अशी दमदाटी पक्षाच्या शिबिरात शिकवली जाते का?, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

दरम्यान, याआधीही प्रशांत बंब यांना वेरूळ येथील ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले होते. आमदार म्हणून १५ वर्षे काय केले ते आधी सांगा. मग मते मागा, असं ग्रामस्थांनी म्हटलं. त्यावर माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल, खाली बस, जास्त आवाज करू नको, असं प्रशांत बंब यांनी ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Gangapur MLA Prashant Bamb meeting has once again become chaotic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.