मी इथला मतदार; तिथल्या उमेदवाराचा मेसेज मला कसा?
By संतोष हिरेमठ | Published: November 1, 2024 09:23 AM2024-11-01T09:23:13+5:302024-11-01T09:26:59+5:30
Maharashtra Assembly Election 2024 :
Maharashtra Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर : ‘मी तर पश्चिमचा मतदार आहे, मला फुलंब्रीच्या उमेदवाराचा ‘एसएमएस’ कसा येत आहे, माझा मोबाइल नंबर कसा मिळाला, असा प्रश्न सध्या शहरवासीयांना पडत आहे. कारण, सध्या विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे मतदारांना थेट मोबाइलवरून प्रचाराचे संदेश येत आहेत.
जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यभरातील उमेदवारांचेही संदेश शहरवासीयांना येत आहेत. मतदारांना अशा संदेशांविषयी आश्चर्य वाटत आहे. कारण, त्यांनी कधीही या पक्षांना स्वतःचे नंबर दिलेले नाही. मग आपला मोबाइल नंबर नेमका इतरांना सहजपणे कसा मिळतोय, असा प्रश्न मतदारांना सतावत आहे.
मोबाइल नंबर कसे मिळवितात?
सर्वेक्षण आणि थेट संपर्क मोहिमा : राजकीय पक्ष नागरिकांच्या पसंतीचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण करतात. यातून मिळालेल्या संपर्कातून डेटा गोळा केला जातो. काही पक्षांनी असे सर्वेक्षण शहरात केले आहे.
सोशल मीडिया आणि डाटा ब्रोकर्स : सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्स व ॲप्सवरून लोकांची व्यक्तिगत माहिती कधीकधी विकली जाते. डाटा ब्रोकर्स या माहितीचे संकलन करून विकू शकतात.
ही घ्या काळजी : नवीन ॲप डाऊनलोड करताना ते कोणत्या परवानग्या मागतात हे बारकाईने पाहावे. विविध लकी ड्रॉ, ऑफर यासाठी फॉर्म्स भरताना मोबाइल नंबर देणे टाळावे. प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन ओळख लपवता येते.