सत्तार- बनकर यांच्यात जंगी कुस्ती, कल्याण काळे, रावसाहेब दानवे यांच्या भूमिकाही ठरणार महत्त्वाच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:50 AM2024-11-05T09:50:32+5:302024-11-05T09:51:49+5:30

Maharashtra Assembly Election 2024: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केल्यामुळे सिल्लोड मतदारसंघात  विद्यमान मंत्री तथा महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांच्यात थेट जंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024: The roles of Jangi Kusti, Kalyan Kale, Raosaheb Danve will also be important between Sattar and Bankar | सत्तार- बनकर यांच्यात जंगी कुस्ती, कल्याण काळे, रावसाहेब दानवे यांच्या भूमिकाही ठरणार महत्त्वाच्या

सत्तार- बनकर यांच्यात जंगी कुस्ती, कल्याण काळे, रावसाहेब दानवे यांच्या भूमिकाही ठरणार महत्त्वाच्या

- श्यामकुमार पुरे 
सिल्लोड - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केल्यामुळे सिल्लोड मतदारसंघात  विद्यमान मंत्री तथा महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांच्यात थेट जंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील सातत्याने चर्चेत असलेले मंत्री अब्दुल सत्तार यांची या मतदारसंघावर जबर पकड आहे.   मागील तीन निवडणुकांत त्यांच्यासमोर विरोधक टिकले नाहीत. काँग्रेसमधून बाहेर पडत २०१९ साली  शिवसेनेकडून उमेदवारी घेत त्यांनी विजयी होण्याची किमया केली होती.

जरांगे यांनी उमेदवार न दिल्याने तसेच मंत्री सत्तार यांनीही जरांगे यांची भेट घेतल्याने या मतदारसंघातील मराठा मतदार काय भूमिका घेतो, याकडे  लक्ष असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने येथे बनेखाँ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. 

अब्दुल सत्तारनंतर सुरेश बनकर यांची कोलांटउडी 
अब्दुल सत्तार १९९९ मध्ये अपक्ष लढले होते. २००४ ते २०१४ पर्यंत ते काँग्रेसमध्ये राहिले. २०१९ मध्ये शिवसेनेत गेले. आता ३५ वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ असलेले सुरेश बनकर यांनीही कोलांटउडी घेऊन उद्धवसेनेत प्रवेश करीत आता महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवले आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मुस्लीम, ओबीसी, दलित, मतदार कुणाच्या मागे जातो. सत्तार यांचा तगडा जनसंपर्क, विकास कामे ही सत्तार यांची जमेची बाजू.  
बनकर यांना दोन वेळा झालेल्या पराभवाची सहानुभूतीही आहे. त्यांच्या बाजूने मराठा मतदार एकवटतील हा मुद्दा मतदारसंघात चर्चेत आहे. 

कल्याण करणारे मदतीला धावतील का? 
-  लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी कल्याण काळे यांचे कल्याण करून त्यांना दिल्लीला पाठवले होते. रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी दानवे यांनी सुरेश बनकर यांना बळ दिले आहे. 
- कल्याण काळे काँग्रेसचे खासदार आहेत. ते आता कल्याण करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मदत करतात, की आघाडी धर्म पाळतात याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहे. 

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: The roles of Jangi Kusti, Kalyan Kale, Raosaheb Danve will also be important between Sattar and Bankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.