"बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:03 PM2024-11-14T23:03:21+5:302024-11-14T23:45:38+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटलं होतं. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नाव करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरेंची होती, ती पूर्ण केल्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ही इच्छा पूर्ण करताच, सर्वात जास्त दुःख काँग्रेसला झाले, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. आता उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. "काँग्रेसच्या काळात हे नाव बदलण्याची हिंमत कोणीही केली नाही. परंतु महायुती सरकार येताच छत्रपती संभाजीनगर हे नाव केले. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण केली," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय थापा मारल्या हे अंबादास दानवेंनी तुम्हाला सांगितलं. पण विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी म्हणाले की मिंध्यांनी या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केलं. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न त्यांनी साकार केलं. सगळ्यात आधी सांगतोय बाळासाहेब बोलू नका ते हिंदुहृदयसम्राट आहेत होते आणि राहणार. ते तुमचे वर्गमित्र नव्हते. पण तुमच्या आठवणीसाठी सांगतो छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्याचे नामकरण हे मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
"छत्रपती संभाजीनगर नाव हे त्यांनी केलं असं मोदींचं म्हणणं असेल तर मग आता छत्रपती संभाजीनगर कुठे आहे. ज्या तत्परतेने तुमचे नोकर निवडणूक आयोग त्यांनी माझ्या पक्षाचे नाव चोरून दरोडेखोरांना दिलं. ती तत्परता माझ्या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करायला का तयार नाही. का अजून नामांतर झालेले नाही. अजूनही मतपत्रिकेवर किंवा मतदार संघाच्या यादीत या जिल्ह्याचे नाव औरंगाबाद आहे मग मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेलात. बाळासाहेबांचे स्वप्न एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केलं असं ते म्हणत आहे ठीक आहे क्षणभर मानलं. मग नवाज शरीफांच्याचा वाढदिवसाचा केक खाऊन आलात हे सुद्धा बाळासाहेबांचे स्वप्न होते का," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन जातात हे सुद्धा बाळासाहेबांचे स्वप्न होतं का? मी मुख्यमंत्री असताना याच संभाजीनगरमध्ये मेडिकल डिवाइस पार्क आणत होतो कुठे गेला तो प्रकल्प? यातून किती जणांना रोजगार मिळाला असता याचा तुम्हाला अंदाज आहे का? हा प्रकल्प इथे आला असता तर मराठवाड्यातील किमान एक लाख तरुणांना रोजगार मिळाला असता, तो तुम्ही गुजरातला घेऊन गेलात आणि हिंदुहृदयसम्राट यांचे स्वप्न म्हणून तुम्ही आम्हाला थापा मारता," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.