Maharashtra Bandh : वाळूज तोडफोडप्रकरणी १७ हल्लेखोर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:18 AM2018-08-11T11:18:33+5:302018-08-11T11:20:17+5:30
मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे.
औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची पोलिसांनी शुक्रवारपासून धरपकड सुरू केली आहे. तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी येथे सांगितले.
गुरुवारी बंददरम्यान वाळूज औद्योगिकनगरीत हिंसक जमावाने परिसरातील जवळपास १०० कारखान्यांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक करून तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. बंददरम्यान कारखान्यांवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषी हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यांची तोडफोड व दगडफेक होत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर जमाव पुन्हा हिंसक होऊन अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोडफोड करताना कैद झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
हल्लेखोर पोलीस कोठडीत
नुकसानीसंदर्भात उद्योजकांकडून रात्री उशिरापर्यंत ३५ तक्रारी देण्यात आल्या असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत निवृत्ती पवार, रवींद्र शेटे, बाळू पेंडगे, मदन गवळी, प्रभाकर साळुंके, सोपान बुरजे, सोमनाथ सुराशे, निकेश बाबर, सुदर्शन काळे, आनंद हुडेकर, मंगेश उदार, बळीराम गायकवाड, सूरज पा. जाधव, गजानन चोरमारे, रामेश्वर वानखेडे, संतोष डुकरे, अक्षय गायकवाड या १७ हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.