Maharashtra Bandh : ...अन् शिवसेना जिल्हाप्रमुखांना झाली धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:51 PM2018-08-09T16:51:17+5:302018-08-09T20:53:21+5:30

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील घोषणांना आक्षेप घेत एका युवकाच्या थोबाडीत मारली. यामुळे संतापलेल्या युवकांनी दानवे यांना धक्काबुक्की केली.

Maharashtra Bandh: ... and the Shiv Sena district chief was beaten | Maharashtra Bandh : ...अन् शिवसेना जिल्हाप्रमुखांना झाली धक्काबुक्की

Maharashtra Bandh : ...अन् शिवसेना जिल्हाप्रमुखांना झाली धक्काबुक्की

googlenewsNext

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य आंदोलनस्थळ असलेल्या क्रांती चौकात जमलेले युवक सर्वपक्षीय नेत्याच्या विरोधात तिव्र घोषणाबाजी देत होते. त्याठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील घोषणांना आक्षेप घेत एका युवकाच्या थोबाडीत मारली. यामुळे संतापलेल्या युवकांनी दानवे यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दानवे यांनी घटनास्थळावरून बाहेर काढले.

क्रांती चौकात शहरातील सर्व भागातील युवक जमा झालेले होते. आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील घोषणानी परिसर दणाणून गेला होता. याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे क्रांती चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन घोषणा देण्यास त्यांनी आक्षेप घेतला. यावरच न थांबता घोषणाबाजी करणाऱ्या युवकांच्या थोबाडीत मारली. दुसऱ्या एका युवकाला दरडावत असताना एकच गोंधळ सुरू झाला. पाठीमागून अंबादास दानवे यांना धक्काबुक्की सुरू झाली. 

अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी अंबादास दानवे यांना सुरक्षिततेत बाहेर काढले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या घडलेल्या प्रकारबद्दल युवकांनी तिव्र संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन केले जात आहे. यात कोणत्याही एका पक्षाला किंवा नेत्याला टार्गेट केले जात नाही. तेव्हा आंदोलनस्थळी यायचे असेल तर पक्ष बाजूला ठेवून यावे, अन्यथा येऊ नये असेही युवकांनी सुनावले. तसेच आंदोलनस्थळी गोंधळ घालण्याची ही अंबादास दानवे यांची तिसरी वेळ आहे. आगामी काळात त्यांनी पक्ष बाजूला ठेवून सहभागी व्हावे अन्यथा धडा शिकविण्यात येईल, असेही युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शिवसेनेच्या नेतृत्वाचा अपमान सहन करणार नाही
अफवा पसरविण्यात येत आहेत. क्रांतीचौकात कोणतीही घटना घडली नाही. मारहणीचाही प्रकार घडला नाही. परंतु शिवसेनेचा किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाचा कोणी अपमान करत असेल तर माझ्यासारखा शिवसैनिक सहन करणार नाही. सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. लोकसभा, विधानसभेत शिवसेनेचे खासदार, आमदार बोलत आहेत. अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टसंदर्भातही शिवसेनेनेच भूमिका मांडली असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ :

Web Title: Maharashtra Bandh: ... and the Shiv Sena district chief was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.