Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा; जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 11:32 AM2021-10-11T11:32:50+5:302021-10-11T11:47:45+5:30
Maharashtra Bandh in Aurangabad : महाविकास आघाडीने पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
औरंगाबाद : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे( Maharashtra Bandh in Aurangabad) . शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून बंदचे आवाहन केले. दरम्यान, जिल्ह्यात शहरी भागात बंदला प्रतिदास असून ग्रामीण भागात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
महाविकास आघाडीने आवाहन केलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे. उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हाॅटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील नसेल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, कमीप्रमाणात प्रवासी बस स्थानकावर आले आहेत. तसेच राज्यात काही भागात बंदला हिंसक वळण मिळून बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आगारातून बस सोडण्याचे प्रमाण अल्प आहे.
दरम्यान, शहरात महाविकास आघाडीने पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यात कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादीचे कैलास पाटील तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिडको, हडको आणि इतर भागात काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवली होती. याचप्रमाणे जिह्यातील ग्रामीण भागात बंदला अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.
कन्नड बंदला अत्यल्प प्रतिसाद
कन्नड - शहरात महाराष्द्र बंदला अत्यल्प प्रतिसाद आहे. नित्याप्रमाणे दुकाने उघडी आहेत. महाविकास आघाडीतील पदाधिकारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत. व्यापारीही दोन मिनिटांकरिता दुकाने बंद ठेवुन पुन्हा सुरु करत आहेत. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहीते, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष प्रविण राठोड, सचिन पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष कोल्हे, तालुकाध्यक्ष बबन बनसोड, शहराध्यक्ष अहेमद अली, शिवसेनेचे तालुकाप्रमुख केतन काजे, शहरप्रमुख सुनिल पवार आदीसह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोयगाव शहरात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद. ग्रामीण भागात मात्र प्रतिसाद नाही.