Maharashtra Bandh : औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्तारोको, एक बस जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:29 AM2018-08-09T11:29:46+5:302018-08-09T11:31:44+5:30
मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेला बंद सुरू होण्यापूर्वीच पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टिव्ही सेंटर रस्त्यावर उभी असलेली बस पेटवून दिली.
औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेला बंद सुरू होण्यापूर्वीच पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी टिव्ही सेंटर रस्त्यावर उभी असलेली बस पेटवून दिली. सकाळपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर मराठा समजाचे हजारो तरूण शांततेत रास्तारोको सुरू केल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सकाळपासून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. नवा मोंढा जाधववाडी येथील भाजीपाला मार्केट पहाटे साडेपाच वाजता बंद झाले. टि.व्ही. सेंटर हडको येथील एका मंगलकार्याललयाजवळ उभी असलेली खाजगी बस अज्ञातांनी जाळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बसची आग विझविली.
पहाटे पासून बंदला सुरुवात
यासोबतच पहाटे साडेपाच वाजता हर्सूल टी पॉर्इंट येथे रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक, सेवन हिल, पुंडलिकनगर चौक, धूत हॉस्पिटल चौक आदी ठिकाणी जोरदार रास्ता रोको सुरू झाला आहे.विशेष म्हणजे रस्त्यावर बसलेले आंदोलक शासनाविरोधात घोषणाबाजी करून आरक्षणाची मागणी करीत आहे. हातात भगवे ध्वज घेतलेले तरूण रस्त्यावरील वाहतूक अडवित आहेत.
कामगारांना पिटाळले
बंदच्या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसी बजाज अॅटो कंपनीने मात्र कंपनी सुरू ठेवल्याची माहिती आंदोलकांना कळाली.यामुळे पहाटे पाच वाजताच आंदोलक कंपनीच्या गेटवर जाऊन बसले होते.सकाळच्या शिफ्टचे कामगार बसमधून उतरताच आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले. यात काही कामगार जखमी झाले.