Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 11:00 PM2018-08-09T23:00:53+5:302018-08-10T06:35:03+5:30
वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर आणखी काही 10 ते 12 लहान कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली.
औरंगाबाद : महाराष्ट्र बंदमध्ये वाळूज औद्योगिकनगरीत मराठा आंदोलनाचा हिंसक उद्रेक झाला. संतप्त जमावाने ६० मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली. पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिका, दुचाकी, ट्रकसह १२ वाहने पेटवली. दगडफेकीत अनेक वाहने फोडली. पोलीस आयुक्तांच्या ताफ्यावरही जमावाने दगडफेक केली.
सकाळी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला दुपारी ११ वाजेनंतर हिंसक वळण लागले. दुचाकींवरून आलेल्या दीडशे ते दोनशे तरुणाच्या जमावाने काचेच्या बाटल्याचे उत्पादन करणाऱ्या कॅनपॅक कंपनीत बळजबरीने घुसून सुरक्षारक्षकांना मारहाण केली. सुरक्षा केबिनवर लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्याने तोडफोड केली.
सुरक्षारक्षकांच्या केबिनमधील सीटीटीव्ही, संगणकाची तोडफोड करून जमावाने पार्किंगमध्ये उभ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर प्रचंड दगडफेक केली. जमावाने कंपनीवर प्रचंड दगडफेक करून आवारातील साहित्याची नासधूस करून पोलिसांची जीप पेटवून दिली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा येताच जमाव तेथून पांगला. जमावाने कॅनपॅक कंपनीत तोडफोड केल्यानंतर लगतच्या वोक्हार्ट कंपनीचे प्रवेशद्वार व कँटीनवर प्रचंड दगडफेक केली. कामगारांची ने-आण करणा-या बसची तोडफोड करीत जमावाने ही बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या जमावाने गुडईअर, मायलान, स्टरलाईट, आकार टुल्स, मेटलमॅन, व्हेरॉक, एण्डुरन्स, सीमेन्स, गणेश प्रेसिंग, आकांक्षा पॅकेजिंग, नहार इंजिनिअरिंग आदी बड्या कंपन्यांसह इतर छोट्या ६० हून अधिक कंपन्यांवर प्रचंड प्रमाणात दगडफेक केली. आकार टुल्स कंपनीत उत्पादित विविध प्रकारचे पान्हे व साहित्य जमावाने रस्त्यावर फेकले होते.
वाळूज औद्योगिकनगरीत कंपन्यांवर दगडफेक केली जात असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद घटनास्थळी दाखल होते. आयुक्तांच्या समोरच संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करून एक ट्रक जाळला. वाळूज अग्निशामक दलाचे पथक ट्रकला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, जमावाने अग्निशामक दलाच्या पथकावर जोरदार दगडफेक सुरू केली. पोलीस आयुक्त प्रसाद यांनी जमावाला शांत करून जात असताना जमावाने पोलीस आयुक्तांच्या ताफ्यावरच दगडफेक केली. बजाज आॅटो कंपनीत जनरल शिफ्टमध्ये येणाºया कामगारांना बंदमुळे कंपनीने फर्स्टशिपमध्ये कामासाठी बोलावले होते. याची माहिती मिळताच आंदोलकांनी बजाज कंपनीकडे मोर्चा वळविला. कामगारांच्या बस अडवून कामगारांना त्यांनी खाली उतरू दिले नाही.या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापनाने सेकंड व थर्ड शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
>प्रचंड नुकसान
व्हेरॉक, इण्डुरन्स, स्टरलाईटसह जवळपास ६० उद्योगांवर जमावाने हल्ले, दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. कंपन्यांच्या कार्यालयांची, संगणकांची, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. एका उद्योगाचे जवळपास ८० लाखांचे नुकसान झाले. ९० टक्के कंपन्या बंद होत्या. तरीही बंद कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले जाईल.
-राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए
>कंपन्यांवर हल्ले करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. रोजगार निर्मितासाठी उद्योगांचा हातभार आहे. शहरात गुंतवणूक वाढविण्यासाठी उद्योगजक प्रयत्न करीत होते. यापुढे स्वत:च्या उद्योगात गुंतवणूक वाढविण्यात येणार नाही आणि नव्या गुंतवणुकीसाठीही प्रयत्न केला जाणार नाही. उद्योगांना सुरक्षा मिळणार नसेल तर उद्योग हलविण्याचा निर्णय घेतला जाईल.
- प्रसाद कोकीळ, माजी अध्यक्ष, सीएमआयए