घर खरेदीदारांसाठी वरदान ठरतोय ‘महारेरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:41+5:302021-06-05T04:04:41+5:30
औरंगाबाद : शहराचा जसा विकास व विस्तार होत आहे, तसेच अनधिकृत बांधकामेही वाढली आहेत. अनधिकृत बांधकामांमुळे अनेक ...
औरंगाबाद : शहराचा जसा विकास व विस्तार होत आहे, तसेच अनधिकृत बांधकामेही वाढली आहेत. अनधिकृत बांधकामांमुळे अनेक जणांची फसवणूक होते. आयुष्याची कमाई घालवून बसतात. मात्र, जे ग्राहक जागरूक, सुज्ञ आहेत ते गृह प्रकल्पाची नोंद ‘महारेरा’च्या संकेत स्थळावर आहे का, याची आधी खात्री करतात व खात्री पटल्यावर निश्चितपणे घर खरेदी करतात. असे हजारो ग्राहक आज चिंतामुक्त जीवन जगत आहेत.
बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईमधील सर्व नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी सर्व गृहप्रकल्पाची ‘महारेरा’मध्ये नोंदणी केली आहे. या संघटनेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना स्थान नाही.
मात्र, शहरात अनेक भागात अनधिकृत बांधकाम सुरू असून कमी रकमेच्या मोहात घर खरेदी करून आयुष्यभर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ देऊ नका, अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांपासून दूर रहा, असे आवाहन क्रेडाईच्या वतीने करण्यात आले आहे.
गृह खरेदीदारांची फसवणूक होऊ नाही म्हणून व त्यांच्या रक्षणासाठी ‘महारेरा’ कायदा अस्तित्वात आला आहे. रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी १ मे २०१७ रोजी रिअल इस्टेट ( नियमन आणि विकास) कायदा २०१६( रेरा) लागू करण्यात आला. मागील १ मे रोजी या कायद्यास ४ वर्षे पूर्ण झाली. राज्यात या अंतर्गत २९००८ हून अधिक प्रकल्पाची नोंद झाल. आहे. २९२०० रिअल इस्टेट एजंटची रेरा अंतगत नोंदणी झाल. आहे.
एवढेच नव्हे तर महारेरा संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या १४२२७ तक्रारीपैकी ९२७१ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.
महारेरा ग्राहकांसाठी वरदान ठरत आहे कारण, महारेरात ज्या बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या गृहप्रकल्पाची नोंद असते त्याच्याकडे केलेले सर्व व्यवहार अधिकृत मानले जातात. कारण, सर्व सरकारी परवानगी घेतल्याशिवाय व अधिकृत असेल तरच त्या प्रकल्पाची नोंद महारेरामध्ये होते.
अनधिकृत म्हणून अनेक घर पाडण्याची मोहीम महानगरपालिकेतर्फे घेतली जाते अशावेळी ग्राहकांना आपण फसवले गेल्याचे कळते व तेव्हा पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो.
पण अशी फसवणूक टाळण्यासाठी पहिले बांधकाम व्यावसायिकची माहिती काढा. त्याचे व त्यांनी बांधलेल्या गृहप्रकल्पाची नोंदणी ‘महारेरा’मध्ये आहे का, हे पहा व नोंदणी असेल तरच अशा अधिकृत गृह प्रकल्पात घर खरेदी करा, असे आवाहन क्रेडाईच्या वतीने करण्यात आले आहे.