Maharashtra Bullet Train: आता मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन धावणार?, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:36 PM2021-08-17T19:36:23+5:302021-08-17T19:37:00+5:30
Maharashtra Bullet Train: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्वाचं विधान केलं आहे.
Maharashtra Bullet Train: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्वाचं विधान केलं आहे. मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणेच मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठीचा प्रयत्न करणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
रेल्वे राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर दानवे यांनी पहिल्यांदाच आपल्या मतदार संघाचा दौरा केला. राज्यातील इतर चार नवनिर्वाचित मंत्र्यांप्रमाणेच दानवे देखील जन आशीर्वाद यात्रा करणार आहेत. याच संदर्भात त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. दानवेंनी याच पत्रकार परिषदेत बुलेट ट्रेन संदर्भातील संकेत दिले.
"मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात मी अभ्यास केला. अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली. या प्रकल्पाच्या शक्यतेबाबत चर्चा झाली आणि यात आम्हाला सकारात्मक संकेत मिळाले आहेत", असं रावसाहेब दानवे म्हणाले.
मुंबई-औरंगाबाद दिड तासात होणार प्रवास
मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प झाला तर मुंबई ते औरंगाबाद अंतर अवघ्या दिड तासात गाठता येणार आहे. तर तीन ते साडेतीन तासांत मुंबईहून नागपुरला पोहोचता येणार आहे. यामुळे या परिसरातील विकासाचे मार्ग खुले होतील. त्यासाठीच या प्रकल्पासाठी गांभीर्यानं विचार सुरू आहे, असंही दानवे म्हणाले.