Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी अतुल सावे देत आहेत दिवसातील १६ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 02:16 PM2019-10-17T14:16:42+5:302019-10-17T14:20:42+5:30

Maharashtra Assembly Election 2019 : पदयात्रा, प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, चर्चा, बैठकांमध्ये जातो संपूर्ण वेळ 

Maharashtra Election 2019 : Atul Save giving 16 hours a day for campaigning | Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी अतुल सावे देत आहेत दिवसातील १६ तास

Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी अतुल सावे देत आहेत दिवसातील १६ तास

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद पूर्वमध्ये भाजप उमेदवाराचा दिनक्रम पहाटे ६ वाजेपासून मंगळवारचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : दुसऱ्या वेळी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर उभे असलेल्या अतुल सावे हे प्रचारासाठी दिवसातील १६ तास देत आहेत. सकाळी ७.३० वाजता निवासस्थानातून बाहेर पडलेले सावे रात्री १२ वाजेपर्यंत व्यस्त राहत आहेत. पदयात्रा, प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, कार्यकर्त्यांसमवेत बैठका आणि निवडणुकीसंबंधी आखलेल्या धोरणांवर चर्चा, असा त्यांचा दिनक्रम आहे. काटेकोर नियोजनावर त्यांचा भर असल्याचे यावेळी लक्षात आले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी संपूर्ण तयारीनिशी उतरलेल्या अतुल सावे यांच्यासमवेत संपूर्ण दिवस घालविला. या दिवसभरामध्ये सावे यांची प्रचार पद्धती जाणून घेतली. 

पहाटे ६ वाजेपासून मंगळवारचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. ज्योतीनगर परिसरातील घरी स्नान आणि देवपूजा आटोपून ७ वाजता विविध वर्तमानपत्रे वाचत त्यांनी नाश्ता केला. तोपर्यंत कार्यकर्ते हजर झाले होते. सकाळी ७.३० वाजता ते निवास्थानातून प्रचारासाठी बाहेर पडले.  नियोजनाप्रमाणे सकाळी ८ वाजता सिडको एन-३ येथील प्रचार कार्यालयात ते पोहोचले. तोपर्यंत एन-४ मध्ये शेकडो कार्यकर्ते जमले होते. महिला आघाडीही हजर होती. एन-४ मध्ये सावे यांचे आगमन होताच ढोल-ताशा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथम त्यांनी संकटमोचन हनुमान मंदिरात दर्शन घेतले व तेथून सुरू झाला त्यांचा दिवसभराचा प्रचार दौरा. सर्वात पुढे ढोल-ताशा पथक दणदणाट करीत होते. त्यांच्यामागे युतीचे झेंडे व भाजपची निशाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो घेऊन तीनचाकी सायकलीवर दिव्यांग कार्यकर्ते गणेश पारसवार होते. जागोजागी नागरिकांनी रांगोळी काढली होती. काहींनी तर फुलांपासून स्वागताची रांगोळी काढली होती. प्रा. वसंत कुंभोजकर यांनी आपल्या घराबाहेर येऊन सावे यांना आशीर्वाद दिला. हा क्षण भावुक ठरला. यावेळी त्यांच्यासोबत राजू वैद्य, अनिल मकरिये, ज्ञानोबा मुंढे, काशीनाथ कोकाटे, आसाराम तळेकर, नगरसेविका माधुरी अदवंत, प्रमोद राठोड, दामूअण्णा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते होते. प्रत्येक बंगल्यासमोर सुवासिनी त्यांचे औक्षण करीत होत्या. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल भालेराव यांच्या निवासस्थानी जाऊन सावे यांनी आशीर्वाद घेतला व तेही या पदयात्रेत सहभागी झाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास एन-३ येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा करून या पदयात्रेची सांगता झाली. दुसऱ्या टप्प्यात पुंडलिकनगरातील एका मंगल कार्यालयात परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली, तसेच आणखी एका स्वागत हॉलमध्येही मतदारांची बैठक घेण्यात आली. याठिकाणी कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. हे सर्व कार्यक्रम संपेपर्यंत दुपारचे ३ वाजले. जेवण व थोडी विश्रांती करून ४ वाजता ते पदयात्रेसाठी सज्ज झाले. 

छत्रपतीनगर, अहिंसानगरात बैठका 
रात्री ८ वाजेच्या सुमारास छत्रपतीनगरातील मैदानात परशुराम सेवा संघातर्फे आयोजित कार्यक्रमात सावे यांनी भेट दिली. त्यानंतर अहिंसानगरातील शिवगणेश मंदिरात परिसरातील रहिवाशांनी बैठकीचे आयोजन केले होते. येथेही अतुल सावे यांनी भेट देऊन सर्वांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. ४यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार श्रीकांत जोशी, प्रशांत देसरडा यांची उपस्थिती होती. यानंतर १०.३० वाजता अग्रसेन भवनातील धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत दर्शन घेऊन ते आपल्या प्रचार कार्यालयात गेले. तिथे रात्री ११.३० वाजेपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करीत दिवसभरातील प्रचारकार्याचा आढावा घेतला. ४दुसऱ्या दिवसाचे नियोजन करीत असताना भेटायला आलेल्या नागरिकांशीही त्यांनी चर्चा केली. तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू झालेला प्रचारदौरा येथे थांबला. तिथून ते विश्रांतीसाठी आपल्या निवासस्थानी गेले.

इंदिरानगर-बायजीपुऱ्यातही पदयात्रा 
दुपारच्या टप्प्यात बायजीपुऱ्यातील गल्ली नंबर ३१ पासून पदयात्रेला सुरुवात झाली. येथील छोट्या-छोट्या गल्लीतही महिला औक्षण करण्यासाठी दरवाजासमोर उभ्या होत्या. पुरुष मंडळी सावे यांना हार घालत होती. येथे मुस्लिम महिलाही पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. 
गल्ली नंबर ३०, २२ व नंतर गल्ली नंबर १८ मध्ये पदयात्रा पोहोचली. येथील स्थानिक रहिवाशांच्या बैठकीत त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. याचठिकाणी एलईडी व्हॅन आली होती. येथे पदयात्रेची सांगता झाली. यानंतर सावे यांनी येथील नगरसेवक कैलास गायकवाड यांच्या घरी भेट दिली. तिथे पाणी पिऊन लगेच सर्व जण पुढील प्रचाराला निघाले. बायजीपुरा परिसरात दोन तास पदयात्रा चालली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता आणि नागरिकही उमेदवार मत मागण्यासाठी आपल्यासमोर आल्याचे पाहून प्रतिसाद देताना दिसले. 

पदयात्रेतील भावुक क्षण...
एफ- सेक्टरमध्ये जयश्री बासरकर या आजी नातीसह बंगल्याबाहेर आल्या. त्यांनी सावेंचे स्वागत केले. हा क्षणही सर्वांसाठी तेवढाच भावुक ठरला. तरुण कार्यकर्ते जयघोष करीत होते. १० वाजेपर्यंत ही पदयात्रा चालली. पुढे एन-३ मध्ये पदयात्रेचे तेवढ्याच जल्लोषात स्वागत झाले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Atul Save giving 16 hours a day for campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.