Maharashtra Election 2019 : धक्कादायक ! मतदानापूर्वीच औरंगाबाद शहर झाले 'कॉंग्रेस मुक्त'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 05:04 PM2019-10-07T17:04:42+5:302019-10-07T17:12:47+5:30
शहरात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार उरला नसल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
औरंगाबाद : उमेदवारी अर्ज छाननीत बाद केल्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश गायकवाड यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर सोमवारी कामकाज सुरु होताच सुनावणी घेण्यात आली. दुपारी त्यांच्या याचिकेवर एक सदस्यीय खंडपीठाची सुनावणी सुरु असताना गायकवाड यांनी त्यांची याचिका मागे घेतली. शहरात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार उरला नसल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
रमेश गायकवाड यांनी अपक्ष आणि काँग्रेसतर्फे असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचे दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा आदेश देण्याची विनंती त्यांनी खंडपीठाकडे केली. रविवारी सुटी असताना न्या. संजय गंगापूरवाला व न्या. ए.एस. किलोर यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली. सोमवारी सकाळी याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर त्यांची याचिका एक सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली. दुपारी सुनावणी दरम्यान गायकवाड यांनी याचिका मागे घेतली. यासोबतच गंगापूरचे मनसेचे उमेदवार अधिकारी यांनीसुद्धा याचिका दाखल केली होती.
औरंगाबाद शहर 'कॉंग्रेस मुक्त'
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जिल्ह्यातील ९ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला औरंगाबाद पश्चिम, फुलंब्री व सिल्लोड या ३ जागा आल्या. त्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीतच बाद झाला. यानंतर याविरुद्ध केलेली याचिका मागे घेतली. यामुळे शहरात कॉंग्रेसचा एकही अधिकृत उमेदवार राहिला नाही. दरम्यान, औरंगाबाद पश्चिम मधून कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. यातील एकाला कॉंग्रेस आपला पाठिंबा घोषित करू करेल असा अंदाज आहे.
जिल्ह्यात कॉंग्रेसतर्फे दोनच उमेदवार उरले
काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वाट्याला आलेल्या ४ जागांवर उमेदवार देणेही जमले नाही. २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व ९ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले होते. यंदा आघाडीत चार जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीतील घटक पक्ष समाजवादीला सोडला. त्यामुळे औरंगाबाद पश्चिम, फुलंब्री व सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसने अनुक्रमे रमेश गायकवाड, डॉ. कल्याण काळे व कैसर आझाद यांना उमेदवारी दिली. त्यातील रमेश गायकवाड यांचा उमेदवार अर्ज छाननीत बाद झाला. आता फक्त डॉ. काळे व आझाद हे दोनच उमेदवार रिंगणात उरले आहेत.