Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात मतदानासाठी आल्या ९२९१ शाईच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:35 PM2019-10-12T13:35:00+5:302019-10-12T13:39:29+5:30
२८ लाख ५० हजार मतदारांच्या बोटावर लागेल शाई
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मुंबईहून जिल्ह्यात ९२९१ शाईच्या बाटल्या पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे ५ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत ३४ हजार ४५६ नवीन मतदारांची संख्या वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. हळूहळू प्रचाराचा पारा चढत आहे. २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मतदान होणार आहे. अवघ्या १० दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपल्याने निवडणूक विभागात लगीनघाई सुरूझाली आहे. मतदानासाठी लागणारी सर्व स्टेशनरी साहित्य आणण्यात आले आहे. सर्व स्टेशनरी जिल्ह्यातील १० निवडणूक निर्णय कार्यालयांकडे पाठविली जात आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३०३७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहे. एका बाटलीत १० मिली निळी शाई असते. एकाबाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येते. यासाठी मुंबईहून ९२९१ शाईच्या बाटल्या आणण्यात आल्या (९३ लिटर) आहेत. जिल्ह्यातील २८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. एकदा बोटावर लावण्यात आलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसत नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले त्यांच्या बोटावरील शाई आता मिटली आहे. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे.
बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा
२००४ मधील निवडणुकीच्या वेळी मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र,२००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर अशी उभी रेषा मारली जात आहे. त्यामुळे शाई जास्त लागत आहे.
१९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर
देशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचाच वापर करण्यात येत आहे. खास मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार करण्यात येते. भारतात उत्पादित या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करीत असतात.
१० मिली निळी शाई एका बाटलीत असते.
३५० मतदारांच्या बोटावर एका बाटलीमधून शाई लावतात.
२८ लाख ४९ हजार ७५५ मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे.
शाई बोटावर लावल्यानंतर १५ सेकंदात तिचा ओलसरपणा जातो. ही शाई पुसता येत नाही.
शाई लावल्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.
मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर लावलेल्या शाईची तपासणी करतात.
डाव्या तर्जनीची तपासणी करून देणारी व्यक्ती मतदानासाठी अपात्र ठरू शकते.
एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल, तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.