Maharashtra Election 2019 : भाजपने बंडाचे निशाण फडकावून शिवसेनेला डिवचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:16 PM2019-10-05T12:16:55+5:302019-10-05T12:22:22+5:30
शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजपाचे बंडाचे निशाण
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे मतदारसंघांचे वाटप युती करारानुसार झाले; परंतु याचे पडसाद बंडखोरीच्या रूपाने सर्वत्र उमटले असून, जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात बंडाचे निशाण फडकावून भाजपने डिवचले आहे.
शिवसेनेनेही भाजपविरोधात बंडखोरी केली आहे. एक-दोन मतदारसंघ वगळता सेना- भाजपमधील इच्छुकांनी शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. युतीच्या विरोधात जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे बंडोबा थंड होतील की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला औरंगाबाद मध्य आणि पश्चिम हे मतदारसंघ आले आहेत. ग्रामीणमधील पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे मतदारसंघ आहेत. भाजपच्या वाट्याला फुलंब्री, औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर हे मतदारसंघ आले आहेत.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीचे चित्र पाहिले, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या उमदेवाराने अपक्ष अर्ज दाखल केला. पश्चिम मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या इच्छुक उमेदवाराने अपक्ष अर्ज भरला. मध्य मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजप उमेदवाराने अर्ज भरला.
ग्रामीण भागातील मतदारसंघात पैठण आणि सिल्लोडमध्ये शिवसेना उमेदवाराची गोची झाली आहे. कारण पैठणमध्ये भाजपच्या इच्छुकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे, तर सिल्लोडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपने भूमिगत साथ दिल्याचे बोलले जात आहे. वैजापूरमध्ये भाजपने शिवसेना उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे, तर कन्नडमध्येदेखील भाजप उमेदवाराने शिवसेना उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला.