Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद पूर्व'मध्ये भाजपचा सामना होणार एमआयएमशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 07:31 PM2019-10-10T19:31:31+5:302019-10-10T19:34:24+5:30
३४ उमेदवार रिंगणात
- विकास राऊत
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील मुख्य लढतीचे चित्र सोमवारी उमदेवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. भाजप महायुती, एमआयएम आणि समाजवादी पार्टी अशीच थेट लढत यावेळीदेखील होणार असली, तर भाजप आणि एमआयएम असाच सामना होणार असल्याचे दिसते आहे.
२०१४ साली भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत भाजप उमेदवार तथा विद्यमान राज्यमंत्री आ. अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. आ. सावे आणि एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात २०१९ ची निवडणूक आमने-सामने होत आहे. मतदारसंघात सर्व मिळून ३४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात समाजवादी पार्टी व महाआघाडीचे उमेदवार कलीम कुरेशी हेदेखील आपले भाग्य अजमावत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि भारिप या दोन्ही पक्षांनी मिळून वंचित बहुजन आघाडीची स्थापन केली. राज्यात कुठेही त्या आघाडीला यश मिळाले नाही. मात्र, औरंगाबादला आघाडी जिंकली. इम्तियाज जलील खासदार झाले.
लोकसभेत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना ५५ हजार ४१७ मते मिळाली, तर आघाडीचे खा. इम्तियाज जलील यांना ९२ हजार ३४७ मते मिळाली. काँग्रेसला १४ हजार ९६ मते मिळाली. या मतदानावरून पूर्व मतदारसंघात पुन्हा भाजपला विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे दिसते. एमआयएमला सपाच्या उमेदवाराचे आव्हान पेलावे लागेल. शिवाय दलित मतदानाचा कल कोणत्या दिशेने जाईल, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होणार काय? महायुतीची जादू चालणार काय, हे कळण्यासाठी आता २४ आॅक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- पूर्व मतदारसंघात चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा काही भाग आहे. त्या वसाहतीमध्ये नवीन गुंतवणूक होण्याबाबत मागील पाच वर्षांत काही विचार झाला नाही. शिवाय, आहे त्या उद्योगांना सुविधा देणे शक्य झाले नाही. बेरोजगारीचा मोठा प्रश्न मतदारसंघात भेडसावतो आहे.
- हायप्रोफाईल, औद्योगिक, गुंठेवारी आणि स्लम वसाहत, असा संमिश्र मतदारांचा पूर्व मतदारसंघ आहे. त्यामुळे प्रत्येक परिसराच्या वेगळ्या समस्या असून अंतर्गत रस्त्यांचा, जलवाहिन्यांचा, पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या समस्या कायम आहेत.
- मतदारसंघात मुस्लिम-दलितबहुल परिसर मोठा आहे. तेथे विकासकामे झाली नाहीत, अशी ओरड आहे. सिडको-हडकोतील घरे फ्री होल्ड करणे आणि पुंडलिकनगरसारख्या गुंठेवारीतील मालमत्तांना पीआर कार्ड मिळण्यासाठी सवलत देण्याचा मुद्दा मागे पडल्याचा नागरी आरोप आहे.
उमेदवारांच्या जमेच्या बाजू
अतुल सावे (भाजप)
- रस्त्यांसाठी १२५ कोटी, कचरा डेपोसाठी ९० कोटी, शहर जलवाहिनीसाठी १६८० कोटी आणण्यात वाटा.
- गुंठेवारीतील कामांसाठी शासन परवानगीसह उद्योगांच्या समस्या सोडविल्या.
- मितभाषी आणि सर्वांशी सलगीने वागणारा नेता म्हणून ओळख.
गफ्फार कादरी (एमआयएम)
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटन बांधणीचा अनुभव.
- शैक्षणिक संस्थेमुळे जनसामान्यांच्या संपर्कात.
- पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही मतदारसंघात संघटन बांधणीतून नागरी संपर्कात राहिले.
कलीम कुरैशी (सपा)
- राजकीय वारसा कुटुंबातून मिळालेला आहे.
- बंधू नगरसेवक असल्यामुळे नागरी समस्यांची जाण आहे.
- व्यावसायिक संबंधांमुळे विविध जाती, धर्मांशी सलोखा.
- मतदारसंघातील असंख्य तरुण त्यांच्या पाठीशी.
- निवडणूक लढविण्याचे कसब.
2०14 चे चित्र
अतुल सावे (भाजप-विजयी)
डॉ. गफ्फार कादरी (एमआयएम-पराभूत)