Maharashtra Election 2019 : बंडखोरीचा आधीपासून केलेला निर्धार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 04:43 PM2019-10-08T16:43:48+5:302019-10-08T16:46:53+5:30
शिंदे हे आमचे कोणाचेच ऐकत नाहीत, असे बागडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य राजू शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांपासून विधानसभा अध्यक्षांचा दबाव झुगारून उमेदवारी अर्ज कायम ठेवला. भाजपचे दुसरे बंडखोर शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी शेवटच्या मिनिटाला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पश्चिम मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष, अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
राजू शिंदे यांनी सर्व दबाव झुगारून उमेदवारी कायम ठेवली. त्यांना विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी माघार घेण्यासाठी विनवणी केल्याचेही समजते. मात्र, त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे सर्वांचीच पंचाईत झाली. राजू शिंदे यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्नही शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. सोमवारी सकाळपासून राजू शिंदे हे भांगसीमाता परिसरात होते. त्याठिकाणी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य दिले. दुपारी ३ वाजेपर्यंत ते उमेदवारी मागे घेण्यासाठी येतील, अशी अपेक्षा होती मात्र शिंदे यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे. शिंदे हे आमचे कोणाचेच ऐकत नाहीत, असे बागडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी औरंगाबाद पश्चिममधून भाजपचे बंडखोर बाळासाहेब गायकवाड यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात १२ उमेदवार कायम राहिले. यामध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट, एआयएमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ, अपक्ष पंकजा माने आदींचा समावेश आहे.
काँग्रेस काय भूमिका घेणार ?
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसने उमेदवारी दिलेले रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्या पंकजा माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
विजयी झाल्यास फडणवीस यांना समर्थन
उमेदवारी कायम ठेवून पश्चिमच्या मतदारांचा, कार्यकर्त्यांचा मान राखला. विकास करणे हाच उद्देश आहे. विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच समर्थन असेल.
- राजू शिंदे, उमेदवार
वैद्य यांची माघार; सावेंचे काम करणार
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल सावे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजू वैद्य यांनी सोमवारी अर्ज मागे घेतला. वैद्य हे १ वाजून ५८ मिनिटांनी माजी आ. प्रदीप जैस्वाल, पूर्व मतदारसंघातील उमेदवार अतुल सावे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे व इतरांसह एन-१२ येथील होमगार्ड समादेशक कार्यालयात गेले. त्यांच्या उपस्थितीत वैद्य यांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मातोश्रीवरून जोपर्यंत फोन येत नाही, तोवर त्यांनी उमेदवारी मागे न घेण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. अंबादास दानवे बंड थोपविण्यासाठी प्रयत्न करीत होते. वैद्य यांचे त्या हॉटेलमधून वरिष्ठांशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पूर्व मतदारसंघात आता ३४ उमेदवार मैदानात आहेत. काही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी युती व एमआयएमचे उमेदवार संपर्क करीत होते. वैद्य यांच्यासह विशाल नांदरकर, रमेश गायकवाड यांच्यासह काही उमेदवारांनी माघार घेत अतुल सावे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
जावेद कुरैशी यांची तलवार म्यान
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा फडकावला होता. मी तलवार म्यान करणार नाही, अशी रविवारी दिवसभर भाषा करणाऱ्या कुरैशी यांनी धर्मगुरूंच्या दबावानंतर मध्यरात्री तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुपारी २.४५ वाजता ते शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समर्थकांसह दाखल झाले. अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना नमूद केले की, मी कोणाच्याही समर्थनार्थ अर्ज मागे घेतला नाही. रविवारी रात्री शहरातील धर्मगुरू, प्रतिष्ठित नागरिकांनी मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी मागे घ्यावी, असे मला सांगितले. त्यामुळे मी माघार घेत आहे. कुरैशी यांनी माघार घेतल्याने एमआयएमची मोठी डोकेदुखी संपली आहे.