Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपचे तनवाणी, एमआयएमचे कुरैशी यांची तलवार म्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 03:44 PM2019-10-07T15:44:54+5:302019-10-07T15:56:47+5:30
मतदारसंघात पुन्हा शिवसेना-एमआयएम थेट लढत होणार
औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीत आज दुपारी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. भाजपचे बंडखोर उमेदवार किशनचंद तनवाणी दुपारी अडीच वाजता औरंगाबाद मध्य विधानसभा कार्यालयात चक्क सेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्यासोबत दाखल झाले. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. युतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या समर्थनार्थ आपणही माघार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. माध्यमांसोबत बोलत असताना डॉक्टर भागवत कराड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून असा उल्लेख केला. त्यामुळे चिडलेल्या तनवाणी यांनी मला कोणाचाही फोन आला नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून मी माघार घेतली नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यासोबतच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दहा मिनिटे शिल्लक असताना एमआयएमचे बंडखोर जावेद कुरेशी आपल्या समर्थकांसह दाखल झाले त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धर्मगुरूंच्या सांगण्यावरून आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत असे त्यांनी नमूद केले.
मध्य मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवण्यासाठी एमआयएम जोरदार प्रयत्न करीत आहे. पक्षाने औरंगाबाद मध्य विधासभा मतदारसंघातून नगरसेवक नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीसाठी जावेद कुरैशी प्रबळ दावेदार होते. त्यांना डावलून पक्षाने सिद्दीकी यांच्यावर विश्वास टाकला. शेवटच्या क्षणापर्यंत कुरैशी यांचेच नाव निश्चित होईल, असे वाटत होते. मात्र, अचानक सिद्दीकी यांचे नाव समोर आल्याने कुरैशी समर्थक जाम भडकले. त्यांनी सोशल मीडियावर तर एमआयएमच्या विरोधात मोर्चाच उघडला. एमआयएमच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच ४ आॅक्टोबर रोजी जावेद कुरैशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे एमआयएमच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास पुन्हा एकदा सेनेला संधी मिळेल, असे एमआयएमकडून सांगण्यात येत आहे. शनिवारी आणि रविवारी जावेद कुरैशी यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून काही मंडळींकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांना यश आले नव्हते. आज नाट्यमय घडामोडी घडत दुपारी कुरैशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धर्मगुरूंच्या सांगण्यावरून आपण उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत असे त्यांनी नमूद केले. यामुळे मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना आणि एमआयएम अशी काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.