Maharashtra Election 2019 : ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे बिरुद पाठ सोडत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:27 AM2019-10-11T01:27:36+5:302019-10-11T01:28:03+5:30
सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील नुकत्याचे झालेल्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद : ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’ असे आपण कधीही म्हटले नाही. एका ठिकाणच्या सभेत पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा मुंडे होतील, असे भाकीत केले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचेही स्पष्ट झालेले होते. त्यावेळेपासून आपणाला ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे लागलेले बिरुद काही पाठ सोडत नाही, असा सावध पवित्रा गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेतला.
सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील नुकत्याचे झालेल्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती होती. शहा यांचे भाषण सुरू झाल्यानंतर जनतेमधून सतत ‘पंकजा मुंडे सीएम, पंकजा मुंडे सीएम’च्या घोषणा देण्यात येत होत्या. यासंदर्भात त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, घोषणा देणारे पदाधिकारी नव्हते. तसेच माझ्याही ओळखीचे नव्हते किंवा मी नियोजितही केलेले नव्हते. त्याला माझ्या लेखी काहीही महत्त्व नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते. त्यांच्या ज्या भावना होत्या. त्याची दखल पक्षाध्यक्षांनी घेतली आहे. मात्र, हे विशेषण माझी पाठ सोडायला तयार नाही.
दोनदा बहिणीला; एकदा भावाला असे काही नसते
लोकशाहीमध्ये एकतर्फी निवडणूक होत नसते. त्यामुळे अतिआत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही. दोन वेळा बहिणीला दिले आता एकदा भावाला निवडून द्या, असे आवाहन धनंजय मुंडे करीत असल्याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, परळी ही काही आमची जहागिरी नाही. एकदा बहिणीला, एकदा भावाला असे काही नसते, असेही पंकजा म्हणाल्या.