औरंगाबाद पश्चिमच्या विकासासाठीच मला मतदारांनी निवडणुकीत उभे केले : राजू शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 04:31 PM2019-10-16T16:31:37+5:302019-10-16T16:37:01+5:30
मतदारसंघात विकासाला भरपूर वाव, मूलभूत सोयी-सुविधाही नाहीत
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात विकास हरवला आहे. मतदारांच्या अपेक्षांवर मागील दहा वर्षांमध्ये निव्वळ पाणी फेरण्याचे काम करण्यात आले. या भागातील विकास राजू शिंदेच करू शकतो, असा ठाम विश्वास नागरिकांना मागील काही दिवसांमध्ये वाटू लागला. त्यामुळे मतदारांनी मला या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे केले आहे. ही निवडणूक राजू शिंदे यांची राहिलेली नाही. मतदारसंघातील हजारो नागरिकच आता राजू शिंदे बनून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खिशातील पैसे खर्च करून प्रचार करीत आहेत.
दर पाच वर्षांनी मतदार आपल्या हक्काचा एक प्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठवतात. आपण पाठविलेल्या उमेदवाराने संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करावा ही रास्त अपेक्षा त्यांची असते. रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती या मूलभूत सोयी-सुविधाही मागील एक दशकापासून मिळत नसतील तर नागरिकांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. नागरिकांनी किती वर्षे यातना सहन कराव्यात हा महत्त्वाचा विषय आहे.
मी या मतदारसंघात नगरसेवक म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत आहे. माझ्या कामाचा आवाकाही नागरिकांना माहीत आहे. सातारा-देवळाईच्या सर्वांगीण विकासासाठी मी कोणते प्रयत्न केले हे सर्वश्रुत आहेत.
शिवसेना-भाजप युती न झाल्यास मी भाजपकडून लढण्यास तयार होतो. युती झाल्याने उमेदवारी मिळाली नाही. तेव्हापर्यंत बराच उशीर झालेला होता. मतदारांनी अगोदरच मला डोक्यावर घेतले होते. त्यांनीच मला निवडणुकीत उभे केले आहे. मागील काही दिवसांमध्ये मी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला. अनेक ठिकाणी नागरिकांनी आपले दु:ख व्यक्त केले. अत्यंत छोट्या-छोट्या गोष्टींची सुविधाही नागरिकांना मिळाल्या नाहीत. मतदारसंघात पाणी, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, बेरोजगारी आदी अनेक प्रश्न गंभीर आहेत.
मतदारसंघात प्रतिस्पर्धी नाही
मतदारसंघातील प्रत्येक मतदाराकडे पोहोचणे मला शक्य नाही. त्यामुळे हजारो नागरिकांनीच निवडणूक हातात घेतली आहे. ते स्वत:च वॉर्डावॉर्डात, गावागावात जाऊन प्रचार करीत आहेत. प्रत्येक जण स्वत: राजू शिंदे बनून प्रचारात मग्न आहे. त्यामुळे मतदारसंघात माझी स्पर्धा इतरांशी असे मी म्हणार नाही. लोकशाहीत प्रत्येक उमेदवाराला लढण्याचा अधिकार आहे. जनता कोणाच्या पाठीशी आहे, हे २१ आॅक्टोबर रोजीच सिद्ध होणार आहे. माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मतदारसंघातील अनेक भागांत तर त्यांना पाय ठेवायलाही जागा नाही. कारण या भागात दहा वर्षांमध्ये ते कधीच फिरकलेले नाहीत. कोणत्या तोंडाने मते मागणार आहेत?
मला जनतेचा पाठिंबा मिळतोय...
राजकीय पक्ष, संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मी प्रयत्न केले नाहीत. प्रामाणिकपणे मी माझी भूमिका प्रचार सभा, कॉर्नर बैठक, छोटेखानी सभा, पदयात्रांमध्ये मांडत आहे. ठिकठिकाणी मतदारांसोबत संवादही साधत आहे. नागरिकांच्या मुख्य समस्याही जाणून नोंद करून घेत आहे. प्रत्येक ठिकाणी मला अभूतपूर्व असा पाठिंबा मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी माझ्यासाठी स्वत:हून काम करीत आहेत. हे त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम आहे. राजू शिंदे त्यांना हक्काचा उमेदवार वाटतोय. पक्षभेद विसरून अनेकांनी माझ्या विजयाचा संकल्प केलाय.
रात्री-अपरात्री धावून येणारा कार्यकर्ता
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात मी मागील काही वर्षांपासून काम करीत आहे. रात्री-अपरात्री मदतीला धावून येणारा कार्यकर्ता अशी माझी ओळख निर्माण झाली आहे. सुखात तर कोणीही सहभागी होतो. दु:खात सहभागी होणे हे महत्त्वाचे असते. अशाप्रसंगी मदत करणेही तेवढेच आवश्यक असते. एका फोनवर सहज उपलब्ध होणारा उमेदवार मी एकटाच आहे. त्यामुळे मतदारांचा माझ्यावर दृढ विश्वास आहे. हा विश्वास यापुढेही असाच अबाधित राहणार आहे.
मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन
- औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा परिसर भौगोलिकदृष्ट्या बराच मोठा आहे. या भागात विकासाला भरपूर वाव आहे. या भागातील जनतेचे मुख्य दु:ख पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन आहे. सातारा-देवळाईच्या विकासासाठी शासनाकडूनच मोठे पॅकेज आणावे लागणार आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे औरंगाबादचे नाव जगाच्या नकाशापर्यंत पोहोचले. गुणवत्तेच्या बळावर कंपन्यांनी हा लौकिक मिळविला आहे. औद्योगिक सुरक्षितता, शांतता ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्याशिवाय शहरात नवीन उद्योग येणार नाहीत.
- महापालिकेच्या माध्यमाने या भागाचा विकास करायचा म्हटले तर आणखी २० वर्षे लागतील. किमान ८०० ते १००० कोटींच्या पॅकेजची गरज आहे. महापालिकेने या भागातील विकासासाठी डीपीआर तयार करून ठेवले आहेत. शासनाकडून फक्त अनुदान आणण्याची गरज आहे.
वाळूज, बजाजनगर, रांजणगाव येथील लोकसंख्या पाहून मला आश्चर्य वाटते. सर्वसामान्य कामगार वर्गाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या कधीच मिळालेल्या नाहीत. वास्तविक पाहता एमआयडीसीत राहणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी शासनाकडूनच निधी आणण्याची गरज आहे.
- पडेगाव भागातील अनेक वसाहती पाहून मी क्षणभर थक्क झालो. या भागात अजिबात विकास झालेला नाही. येथेही सर्वाधिक विकास करण्याची सुवर्णसंधी आहे. कासंबरी दर्गा परिसर आणि विविध कॉलन्यांचा सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
रेल्वेस्टेशन परिसरातील अनेक वसाहतींमध्ये विकास ठप्प झाला आहे. या भागात राहणाऱ्या गोर-गरीब नागरिकांचे राहणीमान सुधारावे, आरोग्य अबाधित राहावे यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.
अपेक्षाभंग होणार नाही
मागील दोन दशकांमध्ये मी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे नागरिकांचे जिव्हाळ्याचे विषय काय असतात याची मला चांगली जाणीव आहे. भविष्यात मी कधीच नागरिकांचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही. पाच वर्षांचा कालावधी काही कमी नसतो. या पाच वर्षांमध्ये कोणीही आपल्या मतदारसंघाचा कायापालट सहज करू शकतो. मागील दहा वर्षांमध्ये या भागात अजिबात विकास झालेला नाही. नेमका विकास कोणाचा झाला, असा प्रश्न मलाही नेहमी पडतो...? असो... औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात २४ आॅक्टोबर रोजी मतदार हक्काचा प्रतिनिधी निवडलेला असल्याचे सर्वांना दिसून येणार आहे.