Maharashtra Election 2019 : बेरोजगारी, शेतकरी आत्महत्येवर सरकारचे एकच उत्तर '३७०'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:28 PM2019-10-14T14:28:16+5:302019-10-14T14:31:49+5:30
विरोधकांचा आवाज बंद करण्याचे राजकारण यशस्वी होणार नाही
कन्नड -कोणते ना कोणते कारण दाखवून विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. कुणाच्या पाठीमागे इडीची चौकशी, कुणा विरुद्ध खटले दाखल करणे अशा प्रकारचे काम करून त्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र अशा पद्धतीचे राजकारण यशस्वी होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नड येथे बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष कोल्हे यांच्या प्रचारार्थ शहरातील गिरणी मैदानावर त्यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, कारखाने बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या मात्र अशा प्रश्नावर सरकार उत्तर देतांना ३७० सांगत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची विटही सरकारने लावली नाही. हे अपयश लपविण्यासाठी शरद पवारांनी काय केलं असा प्रश्न विचारतात. मंडल आयोगाची अंमलबजावणी, महिलांना आरक्षण, रोहयो कायदा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून दिला ही कामे केल्याचेही त्यांनी सांगीतले.
कन्नडचे सांगितले वैशिष्टय
प्रत्येक तालुक्याचे काही तरी वैशिष्टय असते तसे कन्नडचे वैशिष्टय सांगतांना खराब रस्ते असेच सांगावे लागेल.एमआयडीसी नाही त्यामुळे कारखाने नाहीत आणि कारखाने नाहीत म्हणुन रोजगार नाही. शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. अशी तालुक्याची वाताहत झाल्याचे सांगुन विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.