Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार 'औरंगाबाद पूर्व' मतदारसंघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:23 PM2019-10-08T17:23:42+5:302019-10-08T18:07:27+5:30

सर्वांत कमी उमेदवार हे सिल्लोड मतदार संघात आहेत.

Maharashtra Election 2019: The highest number of candidates in 'Aurangabad East' constituency in the district | Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार 'औरंगाबाद पूर्व' मतदारसंघात

Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सर्वाधिक ३४ उमेदवार 'औरंगाबाद पूर्व' मतदारसंघात

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व मतदारसंघात अर्ज भरताना ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून अनेक बंडखोर व अपक्षांनी माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय उमेदवारांचा आकडा समोर आला. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत. तर सर्वांत कमी उमेदवार हे सिल्लोड मतदार संघात आहेत. पूर्व मतदारसंघात ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

५ आॅक्टोबर रोजी छाननी झाल्यानंतर ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.त्यामुळे ३४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. हा आकडा जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत सर्वाधिक आहे. कुठल्या कारणाने येवो अथवा न येवो; परंतु सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे पूर्व मतदारसंघ जिल्ह्यात चर्चेत आला आहे.  जास्त उमेदवार मैदानात असल्यामुळे प्रचाराची जोरदार रणधुमाळी यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. १२ दिवस प्रचारासाठी शिल्लक असून ९ तारखेपासून खऱ्या प्रचाराला रंगत येईल. 
असे राहणार चित्र

औरंगाबाद पूर्व : ३४ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद पूर्वमध्ये ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी आणि समाजवादी पार्टीचे कलीम कुरेशी यांच्यात लढत होणार आहे. २०१४ मध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस  अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत राज्यमंत्री अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. तर डॉ. गफ्फार कादरी यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. 

औरंगाबाद पश्चिम : १२ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे संजय शिरसाठ, एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ तसेच अपक्ष म्हणून भाजपाचे राजू शिंदे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर राजू शिंदे आणि सेनेचे संजय शिरसाठ यांच्या लढत होण्याची चिन्हे आहेत. 

औरंगाबाद मध्य : १४ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात शिवसेना विरूद्ध एमआयएम अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीमुळे ही  निवडणूक सध्या तरी चौरंगी दिसते आहे. २०१४ मध्ये या मतदार संघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल पराभूत झाले होते.

सिल्लोड : ७ उमेदवार रिंगणात 
उमेदवारी मागे घेत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यामागे उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर व शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्र सध्या आहे.

वैजापूर : १६ उमेदवार रिंगणात 
वैजापूर विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात असून, सध्या तरी शिवसेनेचे रमेश बोरनारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर यांच्यातच थेट लढत होईल, असे चित्र आहे. भाजपचे बंडखोर डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे बोरनारे यांची कोंडी झाली होती; परंतु सोमवारी दोघांनीही उमेदवारी मागे घेतल्याने पेच संपुष्टात आला. 

कन्नड : ८ उमेदवार रिंगणात
कन्नड विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे आमने-सामने असून, दोघेही अपक्ष आहेत. भाजपचे जि. प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर हर्षवर्धन जाधव यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

फुलंब्री : १३ उमेदवार रिंगणात 
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे व  काँग्रेसचे डॉ.  कल्याण काळे या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. यावेळीही बागडे व डॉ. काळे यांच्यातच थेट लढत होण्याची शक्यता आहे. 

पैठण : १५ उमेदवार रिंगणात
पैठण विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याही वेळी शिवसेना                 विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होणार  असल्याचे चित्र दिसत असले तरी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांपुढे वंचित बहुजन आघाडीचे मोठे आव्हान राहणार आहे. 

गंगापूर : १४ उमेदवार रिंगणात 
गंगापूर विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपचे प्रशांत बन्सीलाल बंब व राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष अण्णासाहेब माने यांच्यातच थेट लढत होईल, अशी स्थिती दिसत आहे.  

Web Title: Maharashtra Election 2019: The highest number of candidates in 'Aurangabad East' constituency in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.