चहा आणि पकोडेवाल्यांची फक्त चर्चा; प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 06:11 PM2019-10-15T18:11:01+5:302019-10-15T18:13:17+5:30
पथविक्रेत्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : देशात सध्या चहावाला, पकोडेवाल्यांची चर्चा पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री करीत आहेत. त्यांच्या सन्मानाविषयी बोलले जाते; परंतु दुसरीकडे फुटपाथवरील छोट्या व्यावसायिकांना हुसकावण्यात येत आहे. त्यांना बेरोजगार करण्यात येत आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे सदस्य जम्मू आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
देशात सुमारे ३ कोटी, तर महाराष्ट्रात ५ लाख पथविक्रे ते आहेत. दररोज या वर्गांची साधारण ८ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यातून हजारो पथविक्रे ते स्वत:ची उपजीविका भागवत आहेत; परंतु त्यांना बेरोजगार करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आनंद यांनी केला. निवडणुका जनतेच्या प्रश्नांवर होताना दिसत नाहीत. शिवीगाळ, नक्कल अशा अर्थहीन मुद्यांवर निवडणूक होत आहे. आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे म्हटले जाते; परंतु त्याचे मानक कोणालाही माहिती नाही. विधानसभेच्या निवडणुकीत नॅशनल हॉकर्स फेडरेशन औरंगाबाद मध्यचे भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अॅड. अभय टाकसाळ यांच्या पाठीशी असल्याचे जम्मू आनंद म्हणाले. याप्रसंगी अभय टाकसाळ, मनोहर टाकसाळ, डॉ. राम बाहेती, मधुकर खिल्लारे, किसनराज पंडित उपस्थित होते.
पथविक्रेता कायदा का लागू नाही?
फेरीवाल्यांसाठी वर्ष २०१४ मध्ये पथविके्रता उपजीविका संरक्षण व पथ विक्रेय विनिमय कायदा २०१४ तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यासाठी २०१६ मध्ये नियम तयार केले आहेत. प्रत्यक्षात ३ वर्षे उलटूनही हा कायदा लागू नाही. औरंगाबादेत हा कायदा लागू करण्यापासून कोणी रोखले, हे समोर आले पाहिजे. हा कायदा लागू केला जात नसेल तर पथविक्रेता, फेरीवाल्यांवर कारवाईचाही अधिकार नसल्याचे जम्मू आनंद म्हणाले.