Maharashtra Election 2019 : औरंगाबादेत पक्षाच्या नगरसेवकाचे ‘एमआयएम गो बॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 02:50 PM2019-10-09T14:50:38+5:302019-10-09T14:54:59+5:30

‘कटकट’गेट भागात घोषणाबाजी 

Maharashtra Election 2019: 'MIM go back' party corporation stand in Auranagabad Central | Maharashtra Election 2019 : औरंगाबादेत पक्षाच्या नगरसेवकाचे ‘एमआयएम गो बॅक’

Maharashtra Election 2019 : औरंगाबादेत पक्षाच्या नगरसेवकाचे ‘एमआयएम गो बॅक’

googlenewsNext
ठळक मुद्देएमआयएमच्या रॅलीला विरोधनिवडणूक आल्यानंतरच घर दिसते

औरंगाबाद : महापालिकेत २०१५ मध्ये एमआयएमच्या तिकिटावर विजयी झालेले शताब्दीनगर वॉर्डाचे नगरसेवक जहाँगीर खान ऊर्फ अज्जू पहिलवान यांनी मंगळवारी दुपारी चक्क एमआयएम उमेदवाराच्या प्रचार रॅलीला काळे झेंडे दाखविले. ‘एमआयएम गो बॅक’च्या घोषणा देऊन पक्ष नगरसेवकाने ‘कटकट’गेट भागात एकच खळबळ उडवून दिली. पक्षाच्याच नगरसेवकाचे हे रौद्ररूप पाहून एमआयएमला काढता पाय घ्यावा लागला.

मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. कुरैशी यांनी तलवार म्यान केल्याने पक्षाची डोकेदुखी संपलेली असताना मंगळवारी दुसरे संकट उभे राहिले. मध्यमधील  एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ४ वाजता कटकटगेट भागात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही माहिती मिळताच नगरसेवक अज्जू पहिलवान आपल्या समर्थकांसह काळे झेंडे घेऊन रॅलीने कटकटगेट भागात दाखल झाले. त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एमआयएम गो बॅक’च्या घोषणा ऐकून स्थानिक नेते, कार्यकर्तेही क्षणभर अवाक् झाले. त्यामुळे एमआयएम नेत्यांनी रॅली थांबवून पुढील वॉर्डात जाणे पसंत केले.

पाच वर्षांत काय केले
मागील पाच वर्षांमध्ये काय केले, हे पक्षाने जनतेला सांगायला हवे. पक्षाने पाच वर्षांत काहीच काम केलेले नाही. नगरसेवकांची अत्यंत वाईट अवस्था आहे. आमचे फोन नेते घेत नसतील, तर सर्वसामान्यांचे प्रश्न हे काय सोडविणार आहेत. एमआयएमला आपला विरोध असल्याचे अज्जू पहिलवान यांनी सांगितले.

मगच त्यांना घर दिसते
लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम करावे म्हणून स्थानिक, वरिष्ठ नेते माझ्या घरी आले होते. विकासकामे होत नाहीत, स्थानिक नेते लक्ष देत नसल्याची तक्रार मी केली होती. त्यानंतरही आजपर्यंत कोणी लक्ष दिले नाही. ३० ते ४० वेळेस फोन केला तरी प्रतिसाद मिळत नाही. निवडणुका संपल्यावर एमआयएम नेत्यांना सर्वच गोष्टींचा विसर पडतो, असा पक्ष पाहिजे कशासाठी? यंदा मी एमआयएमला वॉर्डात पायही ठेवू देणार नाही. हैदराबादहून आलेले पार्सल परत गेले पाहिजे.
-अज्जू पहिलवान, नगरसेवक, एमआयएम

Web Title: Maharashtra Election 2019: 'MIM go back' party corporation stand in Auranagabad Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.