Maharashtra Election 2019 : खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 08:20 PM2019-10-21T20:20:41+5:302019-10-21T21:00:45+5:30
कदीर मौलाना आणि खा. जलील हे परस्परांवर धावून गेले.
औरंगाबाद: मतदान संपण्यास अवघा अर्धा तास शिल्लक राहिला असताना एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या ओढाताणीमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या अंगावरील कपडे फाटल्याची घटना सोमवारी सायंकाळी कटकटगेट परिसरात घडली. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी लाठी हल्ला करून जमाव पांगविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मध्य विधानसभा मतदार संघातील एमआयएम उमेदवार नासेर सिद्दीकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या कार्यकर्त्यामध्ये सोमवारी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ठिकठिकाणी शाब्दिक चकमक होत होती. कटकटगेट येथील इकरा हायस्कुल या मतदान केंद्राबाहेर कदीर मौलाना यांचे समर्थक तथा एमआयएमचे बंडखोर नगरसेवक अज्जू पहेलवान आणि नासेर सिद्दीकी यांचे समर्थक नगरसेवक सलीम सहारा यांच्यात वाद झाला. यावेळी दोन पक्षाचे लोक आमनेसामने आल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पक्षाच्या समर्थकांना वेगळे केले.
यानंतर अज्जू पहेलवान आणि उमेदवार कदीर मौलाना आणि कार्यकर्ते त्यांच्या मंडपखाली खुर्चीवर बसलेले होते. त्याचवेळी खासदार इम्तियाज जलील, नगरसेवक सलीम सहारा, नगरसेवक फेरोज खान, बाबा बिल्डर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यासह तेथे दाखल झाले. कदीर मौलाना यांच्यासोबत वाद झाल्याचे त्यांना समजल्यानंतर खा. जलील हे पदाधिक ारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडपकडे गेले. कदीर मौलाना आणि खा. जलील हे परस्परांवर धावून गेले. यावेळी वातावरण चिघळल्याचे पाहुन पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. यावेळी झालेल्या ओढाताणीमध्ये खा. जलील यांच्या अंगावरील शर्ट फाटला. या घटनेनंतर कटकटगेट परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे आणि दंगाकाबू पथकासह पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
केवळ कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी
कटकटगेट येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. केवळ कार्यकर्त्यांत किरकोळ हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून जमावाला पांगविल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरात शांतता आहे. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये.
- चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर.