Maharashtra Election 2019 : माझी लढत एमआयएमशी; भाजपचीही भक्कम साथ : संजय शिरसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 07:29 PM2019-10-18T19:29:34+5:302019-10-18T19:32:08+5:30
Maharashtra Election 2019 : मागील दहा वर्षांत मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे.
औरंगाबाद : मागील दहा वर्षांत मतदारसंघातील जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीपासून एमआयएमचे मोठे आव्हान असून, यंदा औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात माझी लढत एमआयएमच्या उमेदवाराशी होणार असल्याचे मत शिवसेनेचे उमेदवार आ. संजय शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
औरंगाबाद शहरावर अनेक वर्षांपासून शिवसेनेचा वरचष्मा आहे. लोकसभा निवडणुकीत काही चुकांमुळे आमचे उमेदवार चंद्रकांत खैरे पराभूत झाले. मात्र या पराभवाची सल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीत फाटाफुटीतून एमआयएमचा उमेदवार विजयी होणार नाही, याचा निश्चय शिवसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असून, मी एमआयएमच्या उमेदवाराचा सामना करण्यास खंबीर आहे. या मतदारसंघात अपक्ष म्हणून काही जण निवडणुकीच्या मैदानात असले तरी मतदारांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. काहीजण जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र जनता त्यांना थारा देणार नाही.कार्यकर्ता हा शिवसेनेचा ‘बेस’ आहे आणि या कार्यकर्त्याचे मूळ संघर्षात आहे. शिवसेनाप्रमुखांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते नेते झाले. काम करताना सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण ठेवणे हीच आम्हाला शिवसेनाप्रमुख आणि आता पक्षप्रमुखांनी दिलेली प्रेरणा आहे. नागरिकांची सुरक्षा आणि संघर्षाबरोबरच विकास हा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असे आ. शिरसाट म्हणाले. माझ्या मतदारसंघातील नागरिकांना उत्तम जाण आहे. यामुळे मला विजयाची खात्री आहे, असे ते म्हणाले.
कार्यकर्ताच प्रचार करतोय
आपल्या प्रचाराच्या पद्धतीविषयी आ. शिरसाट यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघात कार्यकर्ताच प्रचार करतोय. तोच लोकांच्या घरी जातोय. त्यांना भेटतोय. हे कार्यकर्ते म्हणजे सामान्य शिवसैनिक असेल, शाखाप्रमुख असेल, पदाधिकारी असेल, नगरसेवक असेल किंवा आणखी मोठा नेता असेल. सर्व जण झोकून प्रचार करीत आहेत. या प्रचारामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नगरसेवकही भक्कमपणे माझ्या पाठीशी आहेत. आपणच आमदार आहोत, या भूमिकेतून सर्व कार्यकर्ते काम करीत आहेत.
मी केलेली कामे
गोलवाडी रस्त्याचे रुंदीकरण. याठिकाणी अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. हे लक्षात घेऊन या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले.
वाळूज महानगरासह बजाजनगरात रस्ते तयार केले.
शहरासाठी नवी पाण्याची योजना युती सरकारने मंजूर केलीच आहे. यामध्ये सातारा आणि देवळाईचा समावेश केला.
अपघातापासून मुक्ती मिळावी म्हणून बीड बायपासच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधींचा निधी आणला.
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या ंिसमेंट रस्त्याचे काम मार्गी लावले.
विविध वॉर्डांत रस्ते आणि जलवाहिन्यांची सोय केली.
माझे व्हिजन
सातारा, देवळाईसाठी राज्य सरकारकडून विशेष पॅकेज मिळविणे, तसेच या परिसरातील म्हाडा कॉलनीसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे.
गोलवाडी परिसरात वसलेल्या नवीन वाळूज महानगराचे काम पूर्ण करणे.
गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलाला आंतरराष्टÑीय दर्जाचे बनविण्यासाठी आराखडा.
लघु उद्योजकांसाठी वाळूज महानगरात वेगळे हब तयार करणे.
ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह उभारणे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मोफत प्रशिक्षण केंद्र उभारणे.
शिवसैनिकांनी गाफील राहू नये
वाळूज महानगर : जिल्ह्यात एमआयएमच्या रूपाने पुन्हा रझाकारी येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नये. आपली खरी लढत ही एमआयएमशी आहे, असे औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे उमेदवार आ. संजय शिरसाट यांनी गुरुवारी (दि.१७) बजाजनगर येथे सभेत सांगितले. यावेळी माजी महापौर विकास जैन, भाजपचे माजी सभापती गजानन बारवाल, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, विजय वाघचौरे, हनुमान भोंडवे, रामचंद्र कसुरे आदी उपस्थित होते. या सभेत बारवाल, मते, भोंडवे आदींनी आ. शिरसाट यांनी बजाजनगरचा कायापालट केल्याचे सांगितले.
मदतीला धावून येतो, तो खरा शिवसैनिक. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश शिवसैनिकाच्या नसानसात भिनला आहे. या बळावरच या शहरात शिवसेना अग्रक्रमावर आहे.