Maharashtra Election 2019 : राजकारणाने दुरावलेल्या ‘पिया- किशू’ना एकत्र आणले ‘कॉमन फ्रेंड’नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 04:28 PM2019-10-08T16:28:08+5:302019-10-08T16:29:55+5:30

युतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतल्याचे तनवाणीने जाहीर केले

Maharashtra Election 2019: Politics brings together 'Pia-Kishu' aka kishanchand tanwani and pradeep jaiswal | Maharashtra Election 2019 : राजकारणाने दुरावलेल्या ‘पिया- किशू’ना एकत्र आणले ‘कॉमन फ्रेंड’नी

Maharashtra Election 2019 : राजकारणाने दुरावलेल्या ‘पिया- किशू’ना एकत्र आणले ‘कॉमन फ्रेंड’नी

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवारी मिळाल्यानंतर जैस्वाल यांनीही मैत्रीसाठी दोन पावले पुढे जाण्याचा निर्णय घेतला.तनवाणी यांनीही मागील कटुता बाजूला सारून जैस्वाल यांना प्रतिसाद दिला.

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खा. प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची मैत्री तब्बल चार दशकांपासून आहे. परंतु राजकारणातून मागील पाच-सात वर्षांमध्ये या मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली होती. या जिवलग मित्रांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या काही कॉमन मित्रांनी पुढाकार घेतला. दोघांच्या मनातील वितुष्ट संपविण्यात त्यांना यश आले. रविवारी मध्यरात्रीपासून जैस्वाल-तनवाणी यांनी स्वत:हून मैत्रीसाठी दोन पावले पुढे येण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम सोमवारी औरंगाबादकरांना पाहायला मिळाले. तनवाणी यांनी जैस्वाल यांना सोबत नेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ४० वर्षांची मैत्री पुन्हा बहरली.

पिया आणि किशू यांची मैत्री सर्वश्रुत आहे. परंतु या मैत्रीत लहानसहान कारणांवरून दुरावा आला. सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या तनवाणी यांनी जैस्वालविरुद्ध २०१४ मध्ये औरंगाबाद मध्यची निवडणूक लढविली. दोघेही पराभूत झाले; परंतु कॉमन मित्रांसोबत वर्षातून एकदा तिरुपतीला दर्शनासाठी जाण्याचा पायंडा दोघांनीही पाडला. मात्र, संवादातील आपुलकी संपली होती. एखाद्या कार्यक्रमात आमने सामने आले तर हस्तांदोलन होत असे. यंदा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून जैस्वाल यांना उमेदवारी मिळाली. तनवाणी यांनी त्वरित बंडाचा झेंडा उभारला. दोघांच्या झुंजीत कोंडी होणार हे दोघांच्या कॉमन मित्रांनी हेरले. त्यांनी मागील दोन-तीन दिवसांमध्ये दोघांच्या मनातील कटुता दूर करण्याचे काम केले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर तनवाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. युतीच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ मी अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मला कोणाचाही फोन आलेला नाही. हा माझा निर्णय असल्याचे ते म्हणाले.

रविवारी रात्री काय झाले?
उमेदवारी मिळाल्यानंतर जैस्वाल यांनीही मैत्रीसाठी दोन पावले पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तनवाणी यांनीही मागील कटुता बाजूला सारून जैस्वाल यांना प्रतिसाद दिला. दोघांचे रात्री फोनवर बोलणे झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. सोमवारी सकाळी मनोमिलन झाले. दुपारी २.३० वाजता एकाच वाहनात दोघेही मित्र शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात दाखल झाले. क्षणार्धात तनवाणी यांनी मित्रासाठी अर्ज मागे घेतला.
 

Web Title: Maharashtra Election 2019: Politics brings together 'Pia-Kishu' aka kishanchand tanwani and pradeep jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.