Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम आणि कन्नडमध्ये बंडखोरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 04:16 PM2019-10-08T16:16:36+5:302019-10-08T16:17:49+5:30

. सिल्लोड, गंगापूर, पैठण, वैजापूर, औरंगाबाद पूर्व आणि  औरंगाबाद मध्य याठिकाणी झालेली बंडखोरी मागे घेण्यात आली. 

Maharashtra Election 2019: Rebellion continued in Aurangabad West and Kannad | Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम आणि कन्नडमध्ये बंडखोरी कायम

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम आणि कन्नडमध्ये बंडखोरी कायम

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्ह्यातील बंडखोरांना माघार घेण्यासाठी शिवसेना भाजपच्या नेत्यांना फारसे कष्ट पडले नाहीत. 

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिममध्ये आणि कन्नड मतदारसंघांत बंडखोरी कायम राहिली. सिल्लोड, गंगापूर, पैठण, वैजापूर, औरंगाबाद पूर्व आणि  औरंगाबाद मध्य याठिकाणी झालेली बंडखोरी मागे घेण्यात आली. शहरातील तीन मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील इतर सहा मतदारसंघांतील बंडखोरी मागे घेण्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यश आले.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपचे राजू शिंदे यांनी शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याविरुध्द बंडखोरी कायम ठेवली. यामुळे याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. याच मतदारसंघातून आधी काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद झाला आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपतर्फे अतुल सावे, यांच्याविरोधात शिवसेनेचे राजू वैद्य यांनी  अर्ज दाखल केला होता. वैद्य यांनी शिवसेना नेत्यांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघात आता एमआयएमकडून डॉ. गफ्फार कादरी आणि समाजवादी पार्टीकडून कलीम कुरेशी यांच्यासह ३४ उमेदवार रिंगणात आहेत.

औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवेसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केलेले भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे एमआयएमचे बंडखोर जावेद कुरेशी यांनीही अर्ज मागे घेतला. कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या दोन मंत्र्यांचे जावई अर्थात हर्षवर्धन जाधव व किशोर पवार हे दोघे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. भाजपचे जि. प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. 

सिल्लोड मतदारसंघात सुरेश बनकर, सुनील मिरकर या भाजपच्या बंडखोरांनी अपक्ष प्रभाकर पालोदकर यांच्यासाठी माघार घेतली. मुस्लिम उमेदवार मुख्तार शेख, अपक्ष मुश्ताक मेवाती, रियाजोद्दीन देशमुख यांनीही याठिकाणी माघार घेतली. 

कन्नड मतदारसंघात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे मैदानात कायम आहेत. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. येथे सेनेचे उदयसिंग राजपूत निवडणूक लढवीत आहेत.

गंगापूर मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, माजी सभापती विनोद काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष माने यांच्याविरुद्धची उमेदवारी मागे घेतली. याठिकाणी भाजपतर्फे प्रशांत बंब हे तिसऱ्या वेळी नशीब अजमावत आहेत.  

फुलंब्री मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केलेले शिवसेनेचे रमेश पवार यांनीही माघार घेतली. 
वैजापूर मतदारसंघात भाजपचे दोन बंडखोर होते. असे असले तरी जिल्ह्यातील बंडखोरांना माघार घेण्यासाठी शिवसेना भाजपच्या नेत्यांना फारसे कष्ट पडले नाहीत. 

Web Title: Maharashtra Election 2019: Rebellion continued in Aurangabad West and Kannad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.