एकवटलेल्या विरोधकांना सत्तारांची धोबीपछाड; सेनेतून साधली ‘हॅटट्रिक’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:11 PM2019-10-25T13:11:50+5:302019-10-25T13:16:22+5:30

कडवी झुंज देत अब्दुल सत्तारांनी खेचला विजय

Maharashtra Election 2019 : Sattar defeated all united opposition; 'Hat-trick' from Shivsena | एकवटलेल्या विरोधकांना सत्तारांची धोबीपछाड; सेनेतून साधली ‘हॅटट्रिक’ 

एकवटलेल्या विरोधकांना सत्तारांची धोबीपछाड; सेनेतून साधली ‘हॅटट्रिक’ 

googlenewsNext
ठळक मुद्देमुस्लिम मतदारांना शिवसेनेसोबत आणण्याचे जिकिरीचे काम केलेकाँग्रेस उमेदवारासहित ५ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. 

- शामकुमार पुरे 

सिल्लोड : सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांनी विरोधकांसोबत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना कडवी झुंज देत अखेर विजयश्री खेचून आणली. काँग्रेसला ‘रामराम’ करीत सत्तारांनी शिवसेनेत येऊन यावेळी विजयाची ‘हॅटट्रिक’ साधली.

अब्दुल सत्तार यांना पहिल्यांदा मुस्लिम मतदारांना शिवसेनेसोबत आणण्याचे जिकिरीचे काम करावे लागले. या निवडणुकीत त्यांना काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडे जाणारी मते रोखून ती आपल्या पारड्यात घेण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. मराठा बहुल व हिंदू मतदारसंघात मूठभर मुस्लिम मतांच्या भरवशावर सत्तारांनी विजय संपादन केला. या पूर्वीचा मतदारसंघाचा इतिहास बघितला, तर कोणीही आतापर्यंत विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधलेली नाही.

या मतदारसंघात एकूण २ लाख ३८ हजार ४२८ मतदान आहे. त्यात केवळ ७३ हजार मुस्लिम मतदार असून उर्वरित अठरापगड जातीचे १ लाख ६५ हजार ४२८ मतदार आहेत. उलट अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर हे मराठा असतानाही त्यांना १ लाखाचा आकडासुद्धा पार करता आला नाही. सत्तार यांनी १ लाख २३ हजार ३८३ मते घेतली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दादाराव वानखेडे हे करिश्मा करतील असे वाटत होते. किमान १५ ते २० हजार मते घेतील, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाजही चुकीचा ठरला. काँग्रेसचे उमेदवार कैसर आझाद मुस्लिम मतदान खेचतील असे वाटत होते; पण अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला केवळ २ हजार ९६२ मतांवर रोखले. सिल्लोडमध्ये काँग्रेसची वाताहात झाली. याठिकाणी नोटाने २८४४ मतदान घेतले. याठिकाणी काँग्रेस उमेदवारासहित ५ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. 

भाजपचे सुमारे डझनभर नेते, संघ परिवारातील अर्धा डझन संघटना आणि समोर ताकदीने निवडणूक आखाड्यात उतरलेले अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचे मनसुबे धुळीस मिळवण्यात अब्दुल सत्तार यशस्वी झाले. याचे गमक अब्दुल सत्तार यांचे संघटन कौशल्य आहे. विरोधकांना वाड्या-वस्त्या, तांड्यावरील मतदारांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे वाटले नाही. अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले. त्यांनी खेड्या-पाड्यांवर सर्वाधिक लक्ष दिले. शोषितांच्या झोपडीपर्यंत पोहोचून केलेल्या विकासकामांचा प्रचार केला. विरोधकांकडे असे सांगण्यासारखे फारसे मुद्दे नव्हते. अब्दुल सत्तार यांची एक जमेची बाजू म्हणजे ‘एमआयएम’ने त्यांच्या विरोधात सिल्लोडमध्ये उमेदवार दिला नाही.

अब्दुल सत्तारांना मिळालेली मते 1,23,383 
पराभूत उमेदवार    पक्ष    मिळालेली मते
-     प्रभाकर पालोदकर    अपक्ष       99,002
-     दादाराव वानखेडे    वंबआ          7,817
-     कैसर आझाद    काँग्रेस          2,962

विजयाची तीन कारणे...
1. ‘एमआयएम’ने ऐनवेळी उमेदवार दिला नाही. 
2. संघटन कौशल्य, विकासकामांचा जोरदार प्रचार केला.  
3. प्रचाराच्या काळात वेळोवेळी विरोधकांना उघडे पाडण्याची कसर सोडली नाही.

पालोदकरांच्या पराभवाची कारणे
वडील तथा सहकारमहर्षी माणिकदादा पालोदकर यांची मतदारांकडून सहानुभूती मिळाली नाही. आपणच विजयी होणार, ही अतिमहत्त्वाकांक्षा व अतिविश्वास नडला. निवडणुकीला सामोरे जाताना सत्तार यांच्यावर कडाडून टीका करण्याशिवाय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रभावी मुद्दा नव्हता.

Web Title: Maharashtra Election 2019 : Sattar defeated all united opposition; 'Hat-trick' from Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.