Maharashtra Election 2019 : सेनेतील नाराज म्हणतात, साहेब आमचे काय चुकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:58 PM2019-10-03T12:58:28+5:302019-10-03T13:02:23+5:30
सोशल मीडियातून व्यक्त होतायेत भावना
औरंगाबाद :
साहेब, आमचे काय चुकले ...
साडेतीन दशकांपासून निष्ठा ठेवली
शेवटची संधी हवी होती...
डावलले, साहेब माझे काय चुकले...
शिवसेनेने निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलल्यामुळे सोशल मीडियातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. उमेदवारी द्यायचीच नव्हती, तर मुलाखतींचा अट्टहास केलाच कशासाठी. तुमचं ठरलं होतं तर मग आम्हाला एवढी धावपळ करून खर्चात कशासाठी घातले. पक्षात ये-जा करणाऱ्यांचीच तुम्हाला भलावण करायची होती, तर मग आमच्या मुलाखती घेऊन फक्त स्वबळाचा अंदाज घ्यायचा होता काय? यासारखे अनेक प्रश्न सोशल मीडियातून उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसैनिक उपस्थित करू लागले आहेत.
उमेदवारी एकालाच मिळणार असते हे मान्य आहे. परंतु वारंवार तेच ते चेहरे समोर ठेवून पक्ष उमेदवारीचा निर्णय घेत असेल तर आमच्यासारख्यांनी घरचे खाऊन, काय फक्त घोषणा द्यायच्या का? यावर्षी नव्हे तर पुढच्या वेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शिवसेनेचा झेंडा घेणारे अनेक जण कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक घडीतून बाद झाले आहेत. पक्षाने आजवर एकही लाभाचे पद देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचारदेखील केला नाही. त्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. इतर पक्षांतील काही जण आयात करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पदे दिली, ते आयाराम आता विधानसभेत उमेदवारी न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन बसले आहेत. निष्ठावानांना डावलून आयारामांची मनसबदारी का केली जाते, असा प्रश्न तमाम शिवसैनिकांना पडला आहे.
निष्ठावान बंडखोरीच्या तयारीत
मध्य मतदारसंघातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षे उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले काही शिवसेना पदाधिकारी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ३ किंवा ४ आॅक्टोबर रोजी ते उमेदवारी दाखल करू शकतात. तसेच पश्चिम मतदारसंघातूनही भाजपातील काही इच्छुक बंडखोरी करण्याच्या तयारीत असून, बुधवारी बंडखोरांनी बैठक घेतली. पश्चिममधून भाजपने बंडखोरी केल्यास पूर्वमधूनही शिवसेना बंडखोरी करू शकते.