जिद्दी ! १० वर्षांच्या संघर्षानंतर आले मतदार यादीत नाव; मात्र ओळख पटवताना आले नाकीनऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:42 PM2019-10-22T12:42:30+5:302019-10-22T13:09:23+5:30
२८ वर्षाऐवजी ५५ वर्ष वय आल्याने ओळख पटविण्यात अडचण
औरंगाबाद : एका नवमतदाराला त्याचे नाव मतदार यादीत दाखल करण्यासाठी तब्बल दहा वर्षे संघर्ष करावा लागला. महत्प्रयासाने मतदार यादीत नाव आले. मात्र, मतदानासाठी ओळख पटविताना ‘त्या’ मतदाराच्या अक्षरश: नाकीनऊ आल्याची आपबिती त्याने सांगितली.
छावणीतील होलीक्रॉस इंग्रजी शाळेतील मतदान केंद्रावर नवीन मतदार संजय साहेबराव उमाप (२८) यांनी सांगितले की, त्यांचे वय १८ वर्षे झाल्यापासून गेली दहा वर्षे त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि छावणी परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत त्यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंदणी केली. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत आले नाही. सध्याच्या विधानसभेच्या मतदार यादीत त्यांचे नाव यादी भाग १२२ मध्ये अनुक्रमांक १२४३ वर आहे. यावेळी तरी नक्की मतदान करता येईल, म्हणून त्यांना आनंद झाला. मात्र, सोमवरी (दि.२१) प्रत्यक्ष मतदानासाठी गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला. मतदार यादीत त्यांचे वय ५५ वर्षे दर्शविले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. मतदार यादीत ५५ वर्षे वय दाखविल्याची महसूल कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे संजयने सांगितले. वस्तुत: त्यांचे वय २८ वर्षे आहे.
संजय साहेबराव उमाप हे ‘तेच’ असल्याचे पटवून देण्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटची ओळख दिली. तोच संजय असल्याचेही एजंट आणि मतदानासाठी आलेल्या संजयच्या शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या ओळखपत्रापैकी एक असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. परिणामी, संजयला पुन्हा पायी ख्रिस्तनगर येथे त्याच्या घरी जाऊन ‘पॅन कार्ड’ आणून ओळख पटवून द्यावी लागली. ओळख पटविताना मात्र, त्याच्या नाकीनऊ आले. यापेक्षा मतदान न करता घरी जाण्याचा विचारही त्याच्या मनात आला; परंतु तसे न करता पुन्हा निर्धार करून तो मतदान केंद्रावर गेला. हे दिव्य पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी बोटाला शाई लावून पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर ‘आता मी खऱ्या अर्थाने भारताचा नागरिक असल्याचा आलेला अनुभव’ अविस्मरणीय असल्याचे संजयने सांगितले.
काही असे काही तसे...
सुशिक्षित वर्गात दिवसेंदिवस मतदानाबाबत उदासीनता वाढत आहे. त्याची विविध कारणे आहेत. मतदार यादीत नाव नसणे, मतदान केंद्र बदलणे, दूरच्या मतदान केंद्रावर नाव असणे, यामुळे सुशिक्षित मतदार मतदानाकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसते, तर ज्यांना मतदानाची उत्सुकता आहे, त्यांना रोखले जाते.