Maharashtra Election 2019 : ‘ताई, माई, अक्का...’ने मतदारांना साद; डिजिटलच्या जमान्यातही रिक्षांना मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 01:55 PM2019-10-10T13:55:44+5:302019-10-10T14:00:02+5:30
डिजिटल, सोशल मीडियातही रिक्षांवर भोंगा कायम
औरंगाबाद : वॉर रूम, डिजिटल व सोशल मीडियाच्या युगामध्येही निवडणुकीत प्रचारासाठी रिक्षांचा वापर महत्त्वाचा ठरतो. यंदाही विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी जिल्ह्यात पाचशेवर रिक्षा रस्त्यांवर उतरणार आहेत. गल्लोगल्ली रिक्षांवर भोंगा आणि स्पीकरमधून ‘ताई, माई, अक्का...’बरोबर प्रचाराची विविध गीतं वाजणार आहेत.
जिल्ह्यात प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडिया, पत्रके, कार्यकर्ते यांचा उपयोग सुरु आहे. अनेकांचे वॉर रूम सज्ज होत आहेत. या सगळ्यांमध्ये मतदारसंघातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रचार करण्यासाठी रिक्षांचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे सध्या उमेदवारी निश्चित झालेल्या नेत्यांच्या प्रचारासाठी रिक्षांची बुकिंग सुरू झाली आहे. दोन्ही बाजूला पक्षाचे झेंडे, उमेदवाराचे छायाचित्र, नाव आणि निवडणुकीचे चिन्ह असलेले फलक तसेच एका बाजूला लावलेला भोंगा, अशा रिक्षा आगामी दिवसात धावताना दिसणार आहेत. पूर्वी रिक्षात बसलेल्या व्यक्तीकडून ध्वनिक्षेपकांवरून उमेदवाराचा प्रचार केला जात असे. बदलत्या काळात त्याची जागा आता आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या गीतांनी घेतली आहे.
प्रचार संस्थांची मध्यस्थी
प्रचार केलेल्या रिक्षाचालकांना ठरलेली रक्कम मिळत नसल्याने यापूर्वी अनेकदा ओरड झालेली आहे. परंतु आता अनेक प्रचार संस्थांच उमेदवारांसाठी रिक्षांचे नियोजन करून देतात. त्यामुळे रिक्षाचालकांचा आणि उमेदवारांचा संबंधही कमी होत आहे. प्रचार संस्थांकडून थेट भाडे मिळत असल्याने रिक्षाचालकांचीही सोय होत आहे.
रोज हजार ते बाराशे रुपये
संस्थांच्या माध्यमातून रिक्षा प्रचारासाठी लावल्या जात आहेत. यासाठी दररोज हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळते. माईक, स्पीकर असे सर्व साहित्य संबंधित संस्थेकडूनच दिले जाते. जवळपास ५०० रिक्षा प्रचाराच्या कामात राहतील, असे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान म्हणाले.
परवानगी घेणे बंधनकारक
उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रिक्षा आणि अन्य वाहनांसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जाहिरात शुल्क भरणे आवश्यक आहे. त्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. विनापरवानगी प्रचारात वाहनांचा वापर झाला तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने
म्हणाले.